अकोला दिव्य न्युज ब्युरो : बँक ऑफ महाराष्ट्रने आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील मार्च तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्रने १,२१८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून, मागील वर्षीच्या याच तिमाहीतील ८४० कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात ४५ टक्के वाढ झाली आहे.
या आर्थिक वर्षअखेर बँकेचा व्यवसाय जवळपास १६ टक्क्यांनी वाढून चार लाख ७४ हजार कोटी रुपयांवर गेला. दिनांक 26/04/2024 रोजी बँकेचे आर्थिक निकाल जाहीर करण्यात आले. त्यावेळी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निधु सक्सेना यांनी ही माहिती दिली. बँकेचे कार्यकारी संचालक आशीष पांडे, रोहित ऋषी व महाव्यवस्थापक आणि मुख्य फायनान्शिअल अधिकारी व्ही.पी. श्रीवास्तव यावेळी उपस्थित होते.
बँकेने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ४,०५५ कोटी रुपये निव्वळ नफा कमावला असून, मागील वर्षाच्या तुलनेत नफ्यात ५५ टक्के वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षात बँकेला २,६०२ कोटी रुपये नफा झाला होता. वर्षभरात व्याज उत्पन्न ७,७४१ कोटींवरून ९,८२२ कोटी रुपयांवर गेले आहे. मार्च तिमाहीत बँकेचे निव्वळ व्याजउत्पन्नही २,५८४ कोटी रुपये झाले असून, मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत त्यात १८.१७ टक्के वाढ झाली आहे.
बँकेचा एकूण व्यवसाय चार लाख ७४ हजार ४११ कोटींवर गेला असून, त्यात वार्षिक १५.९४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ठेवींचे प्रमाण १५.६६ टक्क्यांनी वाढून त्या दोन लाख ७० हजार ७४७ कोटींवर गेल्या आहेत, कर्ज व्यवसाय १६.३० टक्क्यांनी वाढून दोन लाख तीन हजार ६६४ कोटी रुपयांवर गेला आहे. रिटेल, शेती, सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योग क्षेत्राशी निगडित व्यवसायात वार्षिक २६.६९ टक्के वाढ झाली.
रिटेल कर्ज व्यवसाय ५१ हजार कोटींवर, तर सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राशी निगडित कर्ज व्यवसाय ४२ हजार ११७ कोटींवर गेला. बँकेला थकीत कर्जांचे प्रमाण कमी करण्यात यश आले असून, ३१ मार्च २०२४ रोजी निव्वळ एनपीएचे प्रमाण ०.२० टक्क्यांपर्यंत घटले आहे. एकूण एनपीएचे प्रमाण मार्च २०२३ मधील २.४७ टक्क्यांवरून १.८८ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.अशी माहिती बँक ऑफ महाराष्ट्रच्या जनसंपर्क अधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे.