अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला-वाशीम राज्य मार्गावर पातूर येथील उड्डाणपुलाजवळ आज दुपारी दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे.अपघातातील गंभीर जखमी झालेल्या ३ जणांवर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. अशी माहिती पोलिस सूत्रांकडून प्राप्त झाली. अपघातात एवढा भिषण होता की, दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
वाशिम कडून येत असलेली गाडी क्रमांक एम. एच. ३७ वी ५११ ही गाडी पातूर मार्गाने उड्डाणपुला जवळून अकोल्याकडे जात होती तर पातुर तालुक्यातील आस्टूल येथील रहिवासी ठाकरे यांची एम. एच. ३० बीएल ९५५२ कार वाशिमकडे जात होती. या मार्गावर काम सुरू असल्याने, वळण मार्ग दिल्याने दोन्ही कार एकाच रस्त्यावर भरधाव धावत असताना अचानक आमनेसामने आल्या आणि लक्षात येण्यापूर्वीच एकमेकांना जोरदार धडक दिल्याने भिषण अपघात होवून ४ जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमींना रुग्णालयात नेत असताना दोघांचा वाटेवर मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक व सहकारी घटनास्थळी पोहोचले. या अपघातात रघुवीर अरुणराव सरनाईक वाशिम, शिवानी अजिंक्य आमले नागपूर, अस्मिता अजिंक्य आमले नागपूर व आस्टूल रहिवासी अमोल शंकर ठाकरे, सुमेध इंगळे आणि सिद्धार्थ यशवंत इंगळे ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर गंभीर जखमी पियुष देशमुख, सपना देशमुख व श्रेयस सिद्धार्थ इंगळे यांना उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेमध्ये वाशीम शहरातील शिवाजी शिक्षण संस्थेचे अरूणराव सरनाईक यांचे कुटुंब असल्याची माहिती आहे.अपघाताची भीषणता पाहता अंगावर काटा उभा राहतो.