अकोला दिव्य न्युज ब्युरो : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचार जोरात सुरू असताना सोमवारी सकाळी नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई- मेल नागपूर विमानतळ प्रशासनाला प्राप्त झाला. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात विदर्भातील सर्व दहा जागांसाठी मतदान पार पडले आहे. या दोन्ही टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खरेग आणि इतर अनेक बडे नेत्यांच्या सभा झाल्या आहे. त्यासाठी हे नेते नागपूर विमानतळावर आले आणि तेथून हेलिकॉप्टर सभास्थळी रवाना झाले होते. या विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी सोमवारी सकाळी साडेदहा वाजता एका ईमेलद्वारे देण्यात आली. त्यानंतर बीडीडीएस आणि डॉग स्क्वॅड नागपूर विमानतळावर तैनात करण्यात आले आहे.
सीआयएफची पथक सतर्क झाले आहे. सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. नागपूर विमानतळाकडे जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. तसेच विमानतळाच्या वाहनतळावर सर्व वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. तसेच विमानतळाच्या चारही बाजूंनी सुरक्षा वाढण्यात आली आणि गस्त घालण्यात येत आहे. बॉम्बने विमानतळ उडण्याची धमकी आल्याच्या वृत्ताला विमानतळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. देशातील इतर काही विमानतळाला अशाच प्रकारचे धमकीचे मेल आल्याची माहिती आहे.