गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील वर्धा, अमरावती अकोला, बुलडाणा आणि वाशिम-रिसोड या एकुण 5 लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची टक्केवारीत 2019 च्या तुलनेत अत्यंत नगण्य अशी वाढ झाली आहे. मतदारांच्या दिवशी म्हणजे 26 एप्रिल रोजी विदर्भात सरासरी 40 अंश सेल्सिअस तापमान होते.तर सकाळी 7 ते 5 वाजेपर्यंत या 10 तासात 52 ते 53 टक्के मतदान झाले होते. म्हणजे प्रती तास 5.2 टक्के मतदान झाले होते. मतदानाचीही धीमी गती चिंताजनक ठरली होती. मात्र शेवटच्या एका तासात पाचही लोकसभा मतदारसंघात तब्बल 10 ते 11 टक्के मतदान झाले.परिणामी अकोल्यात 61.79, वाशिम-यवतमाळ 62.87, अमरावती 63.87, वर्धा 64.85 आणि बुलढाणा मतदारसंघात 62.03 टक्के मतदान झाले गत निवडणुकीच्या तुलनेत 2 टक्के मतदान जास्त झाले. मात्र 10 तासातील प्रती तास सरासरी 5 टक्के वगळले तर शेवटच्या तासात 5 टक्के अधिकचे मतदान झाल्याने टक्का वाढला.असो !
मतदारांमध्ये निरुत्साह का होता. या महत्त्वाच्या प्रश्नाचे वेगवेगळी उत्तरे असू शकते. मात्र ‘आपल्या’ मतदारांची नावे मतदार यादीत नसणे आणि मतदानाच्या कमी टक्केवारीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे हजारो पन्नाप्रमुख व बूथप्रमुख सक्रिय होते की नाही.? हा विषय ऐरणीवर आला आहे. भाजपसारखी यंत्रणा कोणत्याच पक्षाकडे नाही, या पक्षाचे सूक्ष्म नियोजन (मायक्रो प्लॅनिंग) असते, अशी प्रशंसा नेहमीच केली जात असताना या प्रशंसेचाच एक भाग असलेले हजारो पन्नाप्रमुख, बूथप्रमुख हे निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सक्रिय नसल्याची माहिती समोर आली. आता दुसऱ्या टप्प्यातही मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे गहाळ होती. अकोला मतदारसंघातील पक्के भाजपला मतदान करणारे मोठ्या संख्येने मतदानापासून वंचित राहिले तर शेवटच्या तासात विशिष्ट मतदान केंद्रावरील गर्दी बघून पन्ना प्रमुखांनी हात आवरला असल्याचे दिसून आले.
मतदार यादीच्या एका पानावर मागून- पुढून अशी 60 मतदारांची नावे असतात. प्रत्येक यादीतील 60 मतदारांमागे भाजपने एक पन्नाप्रमुख नेमलेला आहे आणि असे हजारो पन्नाप्रमुख राज्यात आहेत. पक्षाचे वैशिष्ट्य म्हणून या बाबीचा अनेकदा उल्लेख केला जातो. या पन्नाप्रमुखाने फक्त एका पानावरील मतदारांशी सातत्याने संपर्कात राहावे, त्यांचे प्रश्न कोणते ते जाणून घ्यावे आणि ते सोडविण्यासाठी पक्ष आणि सरकार पातळीवरून त्यांना मदत करावी, त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव धावून जावे, अशी जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. तसेच या मतदारांनी प्रत्यक्ष मतदानासाठी आले पाहिजे याची व्यवस्था पन्नाप्रमुखांनी करणे अपेक्षित असते. मात्र मतदार यादीतील घोळ व मतदानाची कमी टक्केवारीने या संपूर्ण ‘पन्ना’ योजनेचे पितळ उघडे पडले आहे. विदर्भातील नागपूरसह पाच मतदारसंघांत १९ एप्रिलला झालेल्या मतदानानंतर पक्षपातळीवर काही उणिवा समोर आल्याचे आणि त्यात मुख्यत्वे पन्नाप्रमुख योजनेचा उडालेला बोजवारा ही चिंतेची बाब असल्याचे म्हटले जात आहे.
भाजप प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी यासाठी विशेष सभा घेतली होती.तर विशेष सन्मान म्हणून पन्ना प्रमुखांनी त्यांच्या घरासमोर चकचकीत नावाची पाटी लावण्यासाठी सुचनाही केली होती. ही अभिनव योजना देशपातळीवर राबविण्यात आली होती. अनेक वृत्तपत्रांनी फोटोसह सविस्तर बातम्याही प्रकाशित केल्या होत्या. पण अकोला पुर्व आणि पश्चिम या दोन मतदारसंघात अत्यंत कमी प्रमाणात झालेले मतदान ‘पन्ना निघाला निकम्मा’ असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही ना !
पन्ना प्रमुख अभियानात मतदार याद्यांचे एक अॅप तयार केले होते. प्रत्येक पन्नाप्रमुखाला त्याच्याशी जोडले. पण जुन्या मतदार याद्यांच्या आधारे काम केले गेले आणि अद्ययावत मतदार याद्यांना या अॅपशी जोडले गेले नाही, अशा तक्रारी अनेक पन्नाप्रमुखांनी पक्षाकडे केल्या आहेत.अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय तर, या सगळ्या यंत्रणेला अंतिम मतदार यादीत हक्काच्या मतदारांचे नाव नाहीत. हे आधीच कसे लक्षात आले नाही आणि लक्षात आलेही असेल तर मतदार यादीत नावनोंदणी करण्याच्या मुदतीत नसलेली नावे पुन्हा समाविष्ट का करून घेतली गेली नाहीत, असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक बूथवर ५१ टक्क्यांहून अधिक मतदान झाले पाहिजे याची जबाबदारी या सर्व यंत्रणेवर असताना अनेक ठिकाणी त्यापेक्षा कमी मतदान झाले.आता पक्ष प्रमुख काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.