अकोला दिव्य न्युज ब्युरो : राज्यातील महाविकास आघाडीसाठी ही लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून आघाडीच्या सर्व उमेदवारांना मतदारांचा सर्वत्र पाठिंबा मिळत आहे. त्यांचे जागोजागी उस्फुर्त स्वागत करण्यात येत असून ही उमेदवारांच्या विजयाची नांदी आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातही डॉ अभय पाटील मोठ्या अंतराने निवडून येणार आहेत. असा विश्वास प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अभय पाटील यांच्या प्रचारार्थ नानाभाऊ पटोले यांची जाहीर सभा अकोट येथे संपन्न झाली. सभेत महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी हजेरी लावली. पटोले यांनी यावेळी राज्यातील महायुती शासनावर वैचारिक हल्ले चढवत, या निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार नाहीसे होणार असल्याचा दावा केला. महायुतीच्या उमेदवारांना या निवडणुकीत मतदार त्यांची जागा दाखवणार आहे. यावेळी काँग्रेसचा वचननामा सादर केला. काँग्रेसच्या वचननाम्यात अठरा पगड जाती जमातीच्या विकासाची हमी देण्यात आली आहे. या जाहीरनाम्यात युवक,महिला, बेरोजगार, व्यापारी, उद्योजक पासून तर कष्टकरी कामकरी,कामगार,मजूर, शेतकरी, दलित, आदिवासी व समाजाच्या अंतिम टोकाच्या घटकापर्यंतच्या विकासाची हमी देण्यात आली आहे. यासाठी केंद्रात सत्ता स्थापनेसाठी डॉ अभय पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी स्थानिक मुद्द्यांवर बोलताना अकोट- अकोला रस्त्याच्या संदर्भात त्यांनी राज्याच्या महायुती शासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध केला. या सभेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, ज्येष्ठ काँग्रेस नेते हिदायत पटेल, माजी राज्यमंत्री रामदास बोडखे, प्रा संजय बोडके, प्रशांत पाचडे, नानासाहेब हिंगणकर, अनोख राहणे, डॉ प्रमोद चौरे, दिलीप बोचे, सारंग मालानी समवेत काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीचे बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.