अकोला दिव्य न्युज ब्युरो : राज्याच्या शिक्षण विभागाकडून शाळांना उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार २ मेपासून उन्हाळी सुटी सुरू होणार असून, उर्वरित राज्यातील शाळा १५ जूनपासून, तर विदर्भातील शाळा १ जुलैपासून सुरू होणार आहेत.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी या संदर्भातील संयुक्त परिपत्रक प्रसिद्ध केले. राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुटीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता, सुसंगती राहण्यासाठी उन्हाळी सुटी, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ सुरू करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास किंवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने उचित निर्णय घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
पुढील शैक्षणिक वर्ष २०२४-२५मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा १५ जून रोजी सुरू कराव्यात. जून महिन्यातील विदर्भातील तापमान विचारात घेऊन उन्हाळ्याच्या सुटीनंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा ३० रोजी रविवार येत असल्याने १ जुलैपासून सुरू कराव्यात असे नमूद करण्यात आले आहे.