Thursday, November 21, 2024
Homeसंपादकियफडणवीसांच्या वक्तव्यातून परिवर्तनाची नांदी ! उद्या पुर्व विदर्भात मतदान : मविआला अनुकुलता...

फडणवीसांच्या वक्तव्यातून परिवर्तनाची नांदी ! उद्या पुर्व विदर्भात मतदान : मविआला अनुकुलता ?

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २१ राज्य आणि १०२ मतदारसंघासाठी उद्या शुक्रवार १९ एप्रिल रोजी मतदान होणार असून, त्यात महाराष्ट्रातील पुर्व विदर्भातील ५ जागांचा समावेश आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा-गोंदिया या पाच मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. पूर्व विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या पाचही मतदारसंघांत महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत थेट लढत होत असून, यंदा मतविभागणी होऊ नये, असा निर्णय दस्तुरखुद्द मतदारांनी घेतल्याने यंदा विदर्भात वेगळा निकाल लागण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुर्व विदर्भातील मातब्बर नेते गडकरी यांनाही गल्ली बोळात जाऊन प्रचार करावा लागेल, असे वाटत नव्हते.पण तसा प्रचार स्वतः गडकरींना करावा लागल्याने ‘मुकाबला’ तगडा आहे.

२०१९ च्या निवडणुकीत पाचपैकी चार जागा भाजप-शिवसेना युतीने तर एक जागा काँग्रेसने जिंकली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसोबत यंदा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे ताकदीचे उमेदवार आल्याने निवडणुकीचा नूर बदलला.यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मतदारांना ‘मोदी गॅरंटी’चे आश्वासन. ‘सर्व हमींची पुर्तता करण्याचीही मी हमी देत आहे, असं मोदींचं प्रचारतंत्र आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि मोदी समर्थकांकडून शेवटी ‘हिंदू -मुस्लिम’ चं वाजविले जाणारे ” तुणतुणे’ या सर्व NDA उमेदवारांच्या जमेच्या बाजू तर मविआकडे कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहूल गांधी, प्रियांका गांधी, उध्दव ठाकरे आणि शरद पवार एवढेच ! अशा परिप्रेक्ष्यात वंचित बहुजन आघाडी ही निवडणूकीचा तिसरा कोन झाल्याने, मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन होऊन भाजपचा गड अभेद्य राहील, असे अनेकांना वाटतंय.

दरम्यान राजकीय पक्षांकडून जागा जिंकण्याचे केले जाणारे दावे चर्चेत असताना, मात्र मतदारांचा कल बदलत आहे.मागील १० वर्षात पंतप्रधान मोदी यांच्या मुखातून वेळोवेळी ऐकून ऐकून मुखोद्गत झालेले तेच-ते आरोप, तीच कॉंग्रेस व तेच नेहरू आणि त्या सूरातील भाषण अशा प्रचारातून, महागाई, बेरोजगारी,आर्थिक विषमता, विस्कळीत झालेले व्यवसाय-उद्योग अशा अनेक मुद्द्यांवर साधलेली ‘चुप्पी’ आणि याच मुद्द्यावर खदखदत असलेला असंतोष, अशा अनेकानेक कारणांनी भाजप विरुद्ध सुप्त लहर निर्माण झाली आहे. तर मतदारांनी मात्र तोंडावर बोट ठेवलेलं आहे. भाजप नेते देखील खाजगीत हे सर्व कबूल करतात.पण मोदी हे तो मुमकीन है, या वर आजूनही विश्वास आहे ? अनेकांचं हे अवघड जागेवरच दुःखणं झाले आहे ! तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली २००४ मध्ये तत्कालीन जेष्ठ नेते अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमोद महाजन यांच्या आखिव रेखीव नियोजन व व्यवस्थापनात ‘फिल गुड’ शायनिंग इंडिया’ अशा टॅग व पंच लाईन वापरत लढविण्यात आलेल्या लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला आणि सर्वांच्या भोपळा फुटला ! मिडिया तर तोंडघशी पडले.

आज ७ टप्प्यात सुरू झालेल्या लोकसभा निवडणुकीत कमी अधिक प्रमाणात २००४ सारखीच परिस्थिती आहे. शिवसेनाव राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडून, कॉंग्रेस नेत्यांना भाजप किंवा NDA मधिल मित्रपक्षात प्रवेश दिल्या शिवाय महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा कायम ठेवणं शक्य नाही. हे लक्षात घेऊन सूरत व्हाया गुवाहाटी, खोके वाटप, मुळ पक्ष बहाल, अपात्रतेतून सुरक्षा इत्यादी सर्व काही केलं, पण आज निवडणूक काळात हा डाव उलटून अंगावर येण्याची शक्यता बळावली आहे.खैर ! आता भाजप नेते व समर्थकांना देखील हे चांगलेच जाणवू लागले आहे. तर शिवसेना व राष्ट्रवादी का फोडली ? या प्रश्नाचे उत्तर भाजपचे वरिष्ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीतून मिळाले आहे आणि केलेल्या फोडाफोडीने भाजपला अधिक जागांचा लख-लाभ होणार नाही, हे देखील त्यांनी लक्षात आणून दिले आहे.

भाजपानं ‘अब की बार, ४०० पार’चा नारा दिला असताना देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मुलाखतीत ‘आघाड्या ही काळाची गरज’ असल्याचे अधोरेखित केले आहे. या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी ‘आघाड्या ही आता काळाची गरज झाली असून या वास्तवाबरोबर जगणं आपण सगळ्यांनी शिकून घेतलं पाहिजे’, असं विधान केल्याचं टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तात लिहिले आहे.

राजकीय वास्तवाबरोबर जगणं आपण सगळ्यांनी शिकून घ्यायला हवं. आघाड्या या निवडणूक राजकारणाची गरज असतात. प्रत्येकानं या सत्याचा स्वीकार करायला हवा. महाराष्ट्रात भाजपाकडे सुरुवातीला १६ टक्के मतांचा हिस्सा होता. तो वाढून २८ टक्के झाला. आता तो ४२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. जर आम्हाला ५० टक्क्यांचा टप्पा ओलांडायचा असेल, तर नवीन मित्र बनवावेच लागतील. त्यासाठी तडजोडी करणं ही काळाची गरज आहे. असं फडणवीस म्हणाले. म्हणजे आता महाराष्ट्रातील भाजपचा जनाधार थांबला आहे किंवा खुंटला आहे का? भाजपाचा वाटा कमी होत असल्याच्या मुद्द्याशी मी असहमत आहे. असं सांगून फडणवीस म्हणाले की, तुम्ही असं म्हणू शकता की आमची राज्यात वाढ झालेली नाही. आमचा वाटा तेवढाच राहिलाय. अजित पवारांच्या येण्यामुळे फक्त ज्या जागा मूळ शिवसेनेनं लढवल्या असत्या, त्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर वाटल्या गेल्या आहेत इतकंच !

म्हणजे, याचा सरळ अर्थ असा की, भाजप स्वतःच्या बळावर अर्थात एकटा मैदानात उतरून लोकसभेच्या तेवढ्या जागा जिंकू शकत नाही. जेवढ्या मुळ शिवसेनेसोबत युती करुन जिंकल्या होत्या. सरळसोट भाषेत सांगायचे तर, मोदींची ‘गारंटी’ वर भरोसा नाही, भाजपचा नेमका जनाधार कमकुवत आहे, भाजप नेत्यांची क्षमता पुरेशी नाही. निवडणूक जिंकण्यासाठी या एकट्या भाजपला जमेच्या बाजू नाहीत किंवा सत्तास्थापनेसाठी एवढा फौजफाटा पुरेसा नाहीत.असा फडणवीस यांनी कबुलीजबाब दिला का ! दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या भुमिकेवर नाराजी व्यक्त केली जात आहे. तर प्रचारात मतदानासाठी अनेक मुद्दे गृहीत धरून राजकारण केले जात असले तरी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यातून महाराष्ट्रात ‘परिवर्तन’ होतं असल्याचे संकेत मिळत आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ना….

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!