गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : देशातील बहुतांशी लोकांचा विश्वास आहे की, २०२४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा निकाल आजचं लागलेला आहे. सत्ता कोणाची ? या प्रश्नाच्या उत्तरात भविष्यवेत्ताची गरज नाही. निवडणूक जिंकण्याच्या गुणोत्तरावर मतभेद असू शकतात, परंतु अंतिम निकालाबद्दल काहींना शंकाही असू शकते. याची कारणे सर्वज्ञात आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सततची लोकप्रियता, भाजपचे मजबूत संघटन आणि आर्थिक ताकद, त्यातून निर्माण होणारे कथन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय पातळीवर विश्वासार्ह विरोधी पक्षाचा अभाव. पण एवढं सगळं काही असूनही, अलिकडच्या भाजपच्या काही कारवायांमुळे मतदार थोडा गोंधळून गेला आहे. हिंदुत्व हे भाजपाचे मध्यवर्ती कार्ड आहे. हिंदुत्वाचे राजकारण म्हणजे हिंदू धर्माच्या समर्थनार्थ भावनिक उत्साह निर्माण करून राजकीय फायदा मिळवण्याचे खुले धोरण आहे. सर्व विश्वासू हिंदूंनी अयोध्येत भव्य राम मंदिराचा अभिषेक साजरा केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हे मंदिर बांधले गेले, परंतु भाजप त्याचे श्रेय घेईल, अशी अपेक्षा होती,आणि या अपेक्षे प्रमाणे भाजपने भरपूर प्रमाणात श्रेय घेतल. विशेषत: या मुद्द्यावर तोंड देण्यासाठी अक्षम विरोधकांकडे कोणतीही रणनीती नव्हती. असो, पण या सगळ्या गोष्टींनंतरही असे असूनही वाटते की भाजपचे हिंदुत्व ‘नैरेटीव’ जे पंतप्रधानांच्या विविध मंदिरांच्या वारंवार भेटीमुळे बळकट झाले. ते आता शिगेला पोहोचले आहे. अखेर रामलल्लाचे मंदिर बांधले गेले. याचा लोकांना आनंद आहे. अयोध्येतील राम मंदिरात श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि त्यानंतरच्या काही दिवसांतील उत्साहानंतर आता बेरोजगारी, महागाई, शिक्षण, आरोग्य आणि वाढती असमानता या मुद्द्यांवर सरकार काय करत आहे, याची चिंता सामान्यांना सतावत आहे. उघडपणे चर्चा केली जात आहे. भाजप आणि समर्थकांच्या ठायी असं काही नाही, असो!
श्रद्धेचा उपयोग राज्यकारभाराच्या न्याय्य मुद्द्यांवरून एका मर्यादेपर्यंत लक्ष वळवण्यासाठी केला जाऊ शकतो. ती रेषा आता ओलांडली जात आहे का ? तसेच धर्माच्या आधारे मतदारांच्या ध्रुवीकरणाची रणनीतीही आता थकलेली, जीर्ण झालेली दिसू लागली आहे. सुरुवातीच्या काळात या सगळ्या बातांचा व त्यावरील मुद्द्यांचा परिणाम नक्कीच झाला, पण आता हिंदू-मुस्लिम द्वेषाच्या सततच्या ‘आलाप’ व ‘राग’ याचं आकर्षण हळूहळू लुप्त होत चालले आहे. बहुतेक भारतीय सामाजिक अस्थिरता किंवा अंतहीन जातीय संघर्षाच्या बाजूने नाहीत.विशेषत: हिंदू आणि मुस्लिम सण/उत्सवात हिंसा होण्याच्या शंकेपासून लांब राहू इच्छितो. सर्वसामान्याला त्यांचे जीवन शांततेत जगायचे आहे. हिंसाचारापासून दूर राहायचे आहे.अल्पसंख्याकांची संख्या आणि त्यांचा भौगोलिक प्रसार पाहता शांततापूर्ण सहअस्तित्वाचे धोरणच शेवटी देशवासीयांच्या हिताचे आहे, हेही देशवासीयांना कळतं आणि भाजपही जाणून आहे.
आता गोष्ट भ्रष्टाचाराची, तर भाजपने भ्रष्टाचाराविरुद्ध केलेल्या लढाईच्या घोषणेवरील सर्वसामान्यांचा विश्वास भाजप वेगाने गमावत आहे. भाजपचे ध्येय प्रशंसनीय आहे, परंतु आता कथितरित्या अनेक भ्रष्ट लोक, ज्यांच्या विरोधात पक्षाने मोठ्या प्रमाणात निषेध मोहीम सुरू केली होती. ते भाजपात सामील झाले आहेत. ‘वॉशिंग मशिन’ सार्वजनिक ठिकाणी ओव्हरटाईम काम करत आहे, आणि लोकांना प्रश्न पडायला भाग पाडतो की भाजप खरोखरच भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहे की राजकीय हितसंबंधांनी प्रेरित आहे ? लोकांच्या मनात हा विश्वास दृढ होत चालला आहे की, विरोधी पक्षांना लक्ष्य करण्यासाठी ईडी, सीबीआय आणि आयटी यांसारख्या एजन्सींचा अति प्रमाणात गैरवापर होत आहे. विरोधी पक्षांचे नेते या एजन्सीचे लक्ष्य आहेत. भाजपमध्ये प्रवेश करुन घेऊन अनेक ख्यातनाम भ्रष्टाचारी नेत्यांना अंतरिम दिलासा मिळाला आहे. हे उघडकीस आले असून शरणागती पत्करली नाही, तर तुरुंगात टाकण्यात आल्याचेही दिसून येते आहे. आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन तुरुंगात आहेत. निश्चितच हा योगायोग म्हणता येणार नाही.
काँग्रेसच्या निधीत अडथळा आणला. झेपणार नाही एवढ्या दंडाची रक्कम आकारुन कॉंग्रेस पक्षाची बॅक खाती गोठवून ठेवली. आता अति होतंय. हे निवडणूक आयोगाला ही लक्षात आले.निवडणूक जाहीर झाल्यानंतरही अनेक विरोधी नेत्यांना ईडीकडून समन्स पाठवले जात आहेत. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या म्हणण्यानुसार, मोदी मंत्रिमंडळातील 24 मंत्र्यांवर दरोडा, खुनाचा प्रयत्न आणि इतर गंभीर गुन्हेगारी प्रकरणांसह गुन्हे दाखल आहेत, परंतु त्यांच्याविरुद्ध कोणताही तपास सुरू झालेला नाही. खरे तर आश्चर्य वाटते की, भाजपने निवडणूक आधीच जिंकली आहे असे गृहीत धरले असताना या ‘सूडाच्या’ राजकारणाची गरज का आहे?
भाजपने आपला संपूर्ण निवडणूक प्रचार केवळ एकाच व्यक्तीवर केंद्रित केल्यामुळेही चिंता व्यक्त होत आहे. मोदी यांची लोकप्रियता निर्विवाद आहे, पण संपूर्ण पक्षालाच मार्जिनवर ढकलण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र, या सर्व गोष्टींचा मोदींना अभिमान आहे. सलग तिसऱ्यांदा भाजपवर संकटाचे ढग दाटून येणार नाहीत, तरीही सावध राहिले पाहिजे. कारण मतदारांची बुद्धी कधीच गृहीत धरता येणार नाही.एवढ मात्र निश्चितच.असो !