अकोला दिव्य न्युज ब्युरो : एकीकडे रशिया-युक्रेन युद्धावर अद्याप पूर्णांशाने तोडगा सापडलेला नसताना जगासमोर आता आणखी एका युद्धाचं संकट आ वासून उभं राहिलं आहे. इराण आणि इस्रायलमधील संघर्ष चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यात काही दिवसांपूर्वी इराणच्या दूतावासावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळीच इराणनं इस्रायलवर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ला चढवला. इस्रायलच्या काही भागांमध्ये इराणनं डागलेले ड्रोन व क्षेपणास्रे कोसळली आणि खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर एकीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवरून इराणच्या हल्ल्याचा निषेध केला जात असताना इराणनं मात्र हा हल्ला अधिक आक्रमक करण्याचा इशारा दिला आहे.
इस्रायलवर हवाई हल्ला • इराणचा इशारा
इराणकडून इस्रायलवर ड्रोन हल्ले करण्यात आल्याचा दावा इस्रायल लष्कराचे प्रवक्ते रेअर अॅडमिरल डॅनिअल हगेरी यांनी केला आहे. यापैकी अनेक क्षेपणास्रे इस्रायलच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्याच्या आधीच उद्ध्वस्त करण्यात आल्याचंही ते म्हणाले. तसेच, यात १०हून अधिक क्रूज क्षेपणास्त्रांचा समावेश असल्याचीही माहिती इस्रालयकडून देण्यात आली आहे. या हल्ल्याचा जागतिक पातळीवर निषेध करण्यात आला आहे. दरम्यान, इराणनं मात्र हे हल्ले अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. इराणनं संयुक्त राष्ट्रांना लिखित निवेदन दिलं असून त्यात अधिक भीषण हल्ला करण्याचा उल्लेख केला आहे. “जर इस्रायलनं इराणविरोधात कोणत्याही प्रकारची लष्करी कारवाई केली, तर आता त्याला आमचं उत्तर अधिक भीषण आणि संहारक असेल”, असं इराणनं निवेदनात नमूद केलं आहे.
इराणनं आज केलेला हल्ला हा संयुक्त राष्ट्रांच्या कलम ५१ मध्ये नमूद केलेल्या स्वसंरक्षणाच्या अधिकारांतर्गत केला आहे. १ एप्रिल २०२४ रोजी इस्रायलनं सीरियामधील इराणच्या दूतावासावर हल्ला केला. इस्रायलच्या या अशा आक्रमक धोरणाचा प्रतिकार करण्यासाठी इराणनं हल्ला केला”, असंही इराणनं यूएनला पाठवलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
संयुक्त राष्ट्रावर टीकास्र
दरम्यान, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा अबाधित ठेवण्यात अपयश आल्याचा ठपका इराणनं ठेवला आहे. “दुर्दैवाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा अबाधिक ठेवण्याचं त्यांचं कर्तव्य निभावण्यात अपयश आलं आहे. त्यामुळेच त्यांनी इस्रायलला सीमारेषा ओलांडून आंतरराष्ट्रीय कायद्याच्या मूलभूत तत्वालाच हरताळ फासू दिला, अशा शब्दांत इराणनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे.इराणच्या जनतेचं, राष्ट्रीय सुरक्षेचं आणि इराणच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी इराण सरकार बांधील आहे. त्यामुळे आवश्यकता पडल्यास स्वसंरक्षणाचा अधिकार बजावण्यात इराण अजिबात मागे-पुढे पाहणार नाही”, असा थेट इशारा इराणनं दिला आहे.