Sunday, November 24, 2024
Homeराजकारणमोठी बातमी! भाजपाने स्टार प्रचारकांच्या यादीतून एकनाथ शिंदे, अजित पवार यांना वगळले

मोठी बातमी! भाजपाने स्टार प्रचारकांच्या यादीतून एकनाथ शिंदे, अजित पवार यांना वगळले

भाजपाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पत्रानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत केवळ स्वतःच्या पक्षातल्याच नेत्यांचा समावेश असावा, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. निवडणूक आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. लोकप्रतिनिधी कायदा, १९५० नुसार स्टार प्रचारक हे त्याच पक्षाचे असले पाहीजेत, असा नियम आहे. त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश निवडणूक आयुक्तांनी दिले आहेत.

भाजपाने २६ मार्च रोजी ४० स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली होती. यामध्ये २० प्रचारक महाराष्ट्राच्या बाहेरील तर २० प्रचारक राज्यातील होते. यामध्ये पहिले नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तर दुसरे नाव उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे होते. दरम्यान भाजपाने आता नवी यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील स्टार प्रचारक आता देशभर भाजपाचा प्रचार करतील.

शिवसेना आणि महाराष्ट्र भाजपाच्या यादीतही इतर पक्षातील स्टार प्रचारकांचा समावेश आहे. शिवसेना शिंदे गटाच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा समावेश आहे. तर भाजपा महाराष्ट्राच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नावाचा समावेश आहे.

नाव वगळण्याचे कारण काय?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवून तक्रार केल्यानंतर आयोगाने नावं वगळण्याचे आदेश दिले. शिवसेना आणि भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीवर शरद पवार गटाने आक्षेप घेतला होता. आपल्या पक्षाच्या व्यतिरिक्त इतर पक्षाच्या लोकांची नावे स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ट करणे, हे लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ७७ चे उल्लंघन आहे, याकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने लक्ष वेधले.महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून १९ एप्रिल ते २० मे या पहिल्या पाच टप्प्यात महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!