अकोला दिव्य न्युज ब्युरो : नागपूर-पुणे-नागपूर ही सुपरफास्ट समर स्पेशल ट्रेन आता आठवड्यातून दोन नव्हे तर तीन दिवस चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने जाहिर केला आहे. विशेष म्हणजे, ही गाडी आठवड्यातून दोन दिवस चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने १० एप्रिलला जाहिर केला होता. त्याला २४ तास उलटत नाही तोच हा निर्णय फिरवून मध्य रेल्वेने आता ही गाडी आठवड्यातून दिवस चालविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
ट्रेन नंबर ०११६५ नागपूर-पुणे ही विशेष गाडी १३ एप्रिल ते १५ जून या कालावधीत दर सोमवारी आणि शनिवारी चालविणार म्हटले होते. मात्र, आता ही गाडी १८ एप्रिल ते १३ जून या कालावधीत दर गुरुवारी धावणार आहे. त्याचप्रमाणे पुणे ते नागपूर सुपरफास्ट समर स्पेशल (गाडी क्र. ०११६६) १९ एप्रिल ते १४ जून या कालावधीत दर शुक्रवारी धावणार आहे. ही स्पेशल ट्रेन नागपूर-पुणे-नागपूर मार्गावरील रेल्वे वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड चोरडलाईन आणि उरली रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. १३ एप्रिलपासून तिकिटांचे आरक्षण करता येणार आहे.
विशेष म्हणजे, नागपूर-पुणे-नागपूर मार्गावर १२ महिने प्रवाशांची वर्दळ असते. अशात उन्हाळी सुट्यांमध्ये प्रवाशांची या मार्गावर जास्तच गर्दी होते. त्यामुळे आता नागपूर-पुणे किंवा पुणे-नागपूर प्रवासाचा बेत आखणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे चांगला दिलासा मिळाला आहे.