अकोला दिव्य न्युज ब्युरो : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव (PA) बिभव कुमार यांना व्हिजिलेंस डिपार्टमेंटने बडतर्फ केले आहे. दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने बिभव कुमार यांचीही अनेकवेळा चौकशी केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात बंद असलेले अरविंद केजरीवाल यांना धक्के बसत आहेत.
मंगळवारी अरविंद केजरीवाल यांची मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीने केलेली अटक दिल्ली उच्च न्यायालयाने वैध ठरविली. तसेच, उच्च न्यायालयाने अटकेला आव्हान देणारे अरविंद केजरीवाल यांचे सर्व युक्तिवाद फेटाळून लावले होते. तर बुधवारी राऊज अव्हेन्यू न्यायालयाने त्यांना आठवड्यातून पाच वेळा त्यांच्या वकिलाला भेटण्याची परवानगी देणारी याचिका फेटाळली. तसेच, अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयात तात्काळ सुनावणी हवी होती, पण तेथेही विशेष खंडपीठ स्थापन झाले नाही.
आता अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव बिभव कुमार यांना व्हिजिलेंस डिपार्टमेंटने बडतर्फ केले आहे. तसेच, अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमधील मंत्री राजकुमार आनंद यांनीही आपलेच मुख्यमंत्री भ्रष्टाचारात अडकल्याचे समोर आल्यानंतर राजीनामा दिला होता. केजरीवाल सरकारमध्ये गोपाल राय, इम्रान हुसेन, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज, आतिशी यांच्यासह राजकुमार आनंद सुद्धा मंत्री होते. पण भ्रष्टाचाराचे आरोप पाहून राजकुमार आनंद यांनी आप आदमी पक्षाला रामराम ठोकला. तसेच, आपल्या मंत्रिपदाचाही राजीनामा दिला.