माझे नेते नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस आहेत. भाजपमध्ये जाण्याचा निर्णय मी स्वतः घेतला आहे. आमदार रवी राणा यांचा स्वाभिमान पक्ष असून, त्यांनी कुठे राहायचे याचा निर्णय ते घेतील. मात्र, नवरा-बायकोमध्ये बाहेरच्यांनी बोलू नये, असा भीम टोला नवनीत राणा यांनी ‘भाजप’चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रसार माध्यमांशी बोलताना लगावला.
अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर १ एप्रिल रोजी भाजप पदाधिकाऱ्यांच्या आयोजित संवाद मेळाव्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक दिवस नवनीत राणा घरात आदेश देतील आणि रवी राणा यांनासुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज ना उद्या भाजपमध्ये आणतील, असे म्हटले होते.
स्थानिक भाजपच्या नेत्यांचा विरोध झुगारून नवनीत राणा यांना वरिष्ठ भाजप नेत्यांनी उमेदवारी दिली. तेव्हा सगळे आलबेल आहे, असा दावा राणा दाम्पत्याने केला होता. परंतु सगळे सुरळीत सुरू असताना नवनीत राणा यांच्या या वक्तव्याने पुन्हा खळबळ उडाली आहे.आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देऊन नवनीत राणा यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश करून अमरावती लोकसभेची उमेदवारी मिळवली. रवी राणा युवा स्वाभिमान पक्षात तर नवनीत राणा या भाजपमध्ये आहे, हे विशेष.