अकोला दिव्य न्युज ब्युरो : युवा पीढीत फोफावत असलेल्या पाश्चिमात्य संस्कृतीला थोपावून लावण्यासाठी भारतीय संस्कृती आणि परंपरांचे संवर्धन होणे काळाची गरज आहे. काळाची पावले ओळखून संस्कृती संवर्धन समितीतर्फे अकोल्यात भारतीय संस्कृती संबंधी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. प्रामुख्याने वर्ष प्रतिपदा अर्थात हिंदू नूतन वर्षाच्या प्रारंभी अकोला शहरातून गत १७ वर्षांपासून नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येते. यात्रेला सर्वंच स्तरातून भरघोस प्रतिसाद मिळत असून, शहरामध्ये जनजागृती करण्यात संस्कृती संवर्धन समितीचे मोठे योगदान आहे. असे प्रतिपादन संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रा.नितीन बाठे यांनी केले.
अकोल्यातील संस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही मंगळवार ९ एप्रिल २०२४ रोजी गुढीपाडव्याला नवीन वर्षाचे स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी हॉटेल ग्रीनलैंड कॉटेज येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रा.नितीन बाठे, संस्थापक अध्यक्ष डॉ. आर. बी. हेडा आणि कार्याध्यक्ष हरिषभाई आलीमचंदानी यांनी याबाबत विस्तृत माहिती दिली.
संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रा. बाठे यांनी पुढे सांगितले की, यंदा गुढीपाडव्याच्या सुमारास लोकसभेची निवडणूक असल्याने ‘मतदान’ करण्यासाठी जनजागृती व्हावी, म्हणून यात्रेत सहभागी नागरिक फलक घेऊन मतदान करण्याचे आवाहन करणार आहेत. यात्रेत श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांचा राम दरबार यंदा विशेष आकर्षण राहणार आहे. अकोल्यातील नागरिकांनी पारंपरिक वेशभूषेत, फेटे घालून मोठ्या प्रमाणात स्वागत यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
अकोला शहराचे आराध्य दैवत राजराजेश्वर मंदिरातून मंगळवार ९ एप्रिलला सकाळी ७ वाजता महापूजेने स्वागत यात्रेचा प्रारंभ होणार असून त्यानंतर काळा मारोती, सिटी कोतवाली चौकातून शहरातील विविध मार्गे मार्गक्रमण करत बिर्ला राम मंदिर येथे महाआरतीने या यात्रेचा समारोप करण्यात येईल. तत्पूर्वी तेथे रामरक्षा पठण होणार आहे. या यात्रेतील मार्गात येणाऱ्या सर्व मंदिरांना ध्वज प्रदान केले जाईल.
या नववर्ष स्वागत यात्रेत धर्म आणि संस्कृती प्रेमी लोकांनी आपल्या परिवारासह सहभागी व्हावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष प्रा. नितीन बाठे, संस्थापक अध्यक्ष डॉ.आर.बी.हेडा, कार्याध्यक्ष हरिष आलीमचंदानी, स्वागताध्यक्ष पूरुषोत्तम मालाणी, समितीचे उपाध्यक्ष नीलेश देव, नंदकिशोर आवारे, निकेश गुप्ता, अभय बिजवे, विनोद देव, मनीष चंदानी, अशोक पाध्ये, समितीचे संयोजक विनोद जकाते, सहसंयोजक स्वानंद कोंडीलकर, राम भिरड, महिला संयोजिका सोनल ठक्कर, मीनाक्षी आपोतीकर, रश्मी कायंदे, कोषाध्यक्ष शरद वाघ, प्रचार प्रमुख समीर थोडगे यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला संस्कृती संवर्धन समितीचे हेमेंद्र राजगुरू, संस्कार भारतीचे सुधाकर अंबुसकर, निनाद कुळकर्णी, आशा खोकले, चित्रा बापट, अर्चना शर्मा, अतुल आखरे, प्रशांत पाटील, अभिजीत भाटवडेकर, खेमराज भटकर, रूपेश वाखारकर, कृष्णा शर्मा, पंकज सादराणी, वैष्णव देशमुख, रविंद्र देशमुख, पंकज सहगल, हर्षल पातूरकर उपस्थित होते.