प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत येईल, अशी चिन्हं दिसत होती. मात्र चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतरही जागावाटप निश्चित न झाल्याने प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. तसंच वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभरात २० पेक्षा अधिक उमेदवारांचीही घोषणा करण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी काँग्रेसकडून अजूनही आंबेडकर यांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू असून नागपुरातील काँग्रेस नेते अनिस अहमद यांनी प्रकाश आंबेडकरांना नवी ऑफर दिली आहे. प्रकाश आंबेडकरांना आम्ही राज्यसभेवर घेऊ आणि सत्ता आली तर केंद्रात मंत्रिपदही देऊ, असं अहमद यांनी म्हटलं आहे.
वंचित बहुजन आघाडीबाबत बोलताना अनिस अहमद म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर स्वबळावर निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला पाठिंबा द्यावा. आम्ही त्यांना राज्यसभेवर घेऊ. तसंच त्यांना केंद्रात मंत्रिपदही देऊ. याबाबतचा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला आहे. हा प्रस्ताव ते स्वीकारण्याची शक्यताही आहे,” असा दावा अहमद यांनी केला आहे.
नाना पटोलेंनीही केलं होतं भाष्य
वंचितने स्वबळावर लढण्याची घोषणा केली असली तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आम्ही अजूनही मैत्रीचा हात पुढे करण्यास तयार असल्याचं वक्तव्य दोन दिवसांपूर्वी केलं होतं. तसंच “२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ओवैसीच्या एमआयएम व वंचितने मतविभाजन केल्याने भाजपाच्या विजयाचा मार्ग सोपा केला. आजची लढाई सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आहे, मतविभाजनाचे पाप करु नका,” असं आवाहनही नाना पटोले यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना केले. दरम्यान, काँग्रेसकडून वारंवार होणाऱ्या या आवाहनाला प्रकाश आंबेडकर खरंच प्रतिसाद देतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.