अकोला दिव्य न्युज ब्युरो : भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सत्ताधाऱ्यांवर आरोप केले होते, त्यांचे घोटाळे बाहेर काढले होते. राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून किरीट सोमय्या प्रसिद्धीपासून थोडे लांब राहिले. मात्र, सोमय्या यांनी आता महायुती सरकारच्याच कारभारावर बोट ठेवलं आहे. महाविकास आघाडी सरकारवर वेगवेगळ्या घोटाळ्यांचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी महायुती सरकारच्या कारभारावर भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी दावा केला आहे की, या सरकारचा एक घोटाळा त्यांनी रोखला आहे.
सोमय्या म्हणाले, “गेल्या दोन वर्षात मी पाहिलं की या सरकारने पण कुठेतरी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. या सरकारमध्येही घोटाळ्याचे प्रयत्न केले गेले. कारण व्यक्ती तर त्याच आहेत ना… (मविआतलेच अनेक नेते आज महायुतीत आहेत.) तिथले लोकच तुम्ही इकडे घेतले आहेत. परंतु, मी दिल्लीत जाऊन ज्या लोकांना सांगायला हवं होतं त्यांना या घोटाळ्याबद्दल सांगितलं. एक मंत्री पूर्वी घोटाळा करत होता, तो आधी एकटा करत होता, आता महायुतीच्या सरकारमध्येही त्याने तसा प्रयत्न केला. तसेच या घोटाळ्यात त्याने एका भाजपावाल्याला साथीदार करून घेतलं. पण मी दिल्लीत जाऊन त्याबद्दल सांगितलं. ज्या व्यक्तीला याबद्दल सांगायची गरज होती, त्या व्यक्तीलाच मी सांगितलं. मी हे खपवून घेणार नाही. शेवटी ती निविदा रद्द करण्यात आली. सोमय्या मुंबई तकशी बोलत होते.
किरीट सोमय्या म्हणाले, घोटाळ्यांचे प्रयत्न होत असतात. फक्त या सरकारमध्ये एक फरक आहे. इथले लोक नियंत्रणात आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्टी म्हणजे आता एखाद्या व्यक्तीवर खुन्नस ठेवून मुख्यमंत्री कार्यालय सुपाऱ्या देत नाही. आधीच्या सरकारसारखी स्थिती आता नाही. परंतु, मी एक गोष्ट ठामपणे सांगू इच्छितो की, नोव्हेंबर २०२४ नंतर राज्यात जे सरकार येईल त्यामध्ये तुम्हाला खूप चांगले बदल झालेले दिसतील.दरम्यान, यावेळी सोमय्या यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुम्हाला ‘मातोश्री’वर (शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे) राजकीय हल्लाबोल करण्यास कोणी सांगितलं होतं? त्यावर सोमय्या म्हणाले, “मातोश्रीचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे आदेश मला दिल्लीतून आले होते. तसंच देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितलं होतं. देवेंद्र फडणवीस यांना पक्षानेच तो आदेश दिला होता.