अकोला दिव्य न्युज ब्युरो : मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळी याला १० जानेवारी २००६ रोजीच्या शासन निर्णयानुसार शिक्षेत सूट देण्याच्या मागणीवर चार आठवड्यात निर्णय घ्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज शुक्रवारी राज्य सरकारला दिला.
गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. १० जानेवारी २००६ रोजीच्या शासन निर्णयामध्ये १४ वर्षे कारावास भोगलेल्या आणि वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्या कैद्यांना शिक्षेत सूट देण्याची तरतूद आहे. गवळीने वयाची ७० वर्षे पूर्ण केली असून तो मे-२००८ पासून कारागृहात आहे.
कारागृह अधीक्षकांनी गवळीला या शासन निर्णयाचा लाभ दिला जाऊ शकत नाही, असे कारण नमूद करून त्याचा शिक्षेत सूट मागणारा अर्ज १२ जानेवारी २०२३ रोजी फेटाळला होता. त्यामुळे गवळीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याच्या याचिकेवर न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गवळीतर्फे ऍड. मीर नगमान अली यांनी बाजू मांडली.