अकोला दिव्य न्युज ब्युरो : वंचित बहुजन आघाडीने यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघासाठी गाजावाजा करत जाहीर केलेला उमेदवार ऐनवेळी बदलविला. मात्र, नामांकनाच्या अखेरच्या दिवशी वंचितकडून ज्या उमेदवाराने अर्ज दाखल केला, त्यात त्रुटी निघाल्याने तो बाद झाला. त्यामुळे ‘वंचित’ निवडणुकीपासून वंचित राहणार आहे. वंचितच्या नेत्यांच्या धरसोड वृत्तीने वंचितच्या हातातून ‘तेलही गेले, अन तुपही गेले’, अशी अवस्था झाल्याची चर्चा आता जिल्ह्यात रंगली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित लक्ष्मण राठोड, रा. दारव्हा यांनी गुरूवारी नामांकन अर्ज दाखल केला होता. आज शुक्रवारी सर्व अर्जांची छाननी सुरू आहे. या छाननीत वंचितचे उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आला. यामुळे वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अखेपर्यंत महाविकास आघाडीसोबत सूत जुळले नाही. त्यामुळे वंचितच्या पहिल्या यादीत यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून दारव्हा तालुक्यातील सुभाष पवार यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. मात्र त्यांनतर झालेल्या घडामोडीत प्रकृतीचे कारण पुढे करत सुभाष पवार यांची तिकीट कापून ती अभिजित राठोड यांना देण्यात आली. अभिजित राठोड यांनी गुरूवारी समर्थकांच्या उपस्थितीत नामांकन अर्ज दाखल केला होता.
उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेत वंचितचे उमेदवार अभिजित राठोड यांचा नामांकन अर्ज रद्द करण्यात आला आहे. हा अर्ज नेमका कशामुळे रद्द झाला यासंदर्भात अधिकृत माहिती प्रशासनाने अद्याप दिली नाही. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीला गठ्ठा मतदानाच्या भरवशावर टक्कर देणारा महत्वाच्या पक्षाचा उमेदवार आता रिंगणात राहणार नाही. बंजारा मतांचे विभाजन करण्यासाठी वंचितने ही खेळी पण, वंचितचा डाव त्रुटीत अडकल्याने वंचितची मते कोणाच्या पथ्यावर पडतील, याचे गणित मांडणे सुरू झाले आहे.