Wednesday, January 15, 2025
Homeसंपादकिय'भाऊ' देखिल मदतीला आला नाही ! 'भावना'अनावर झाल्याने अपमानाचा बदला घेण्याची शक्यता?

‘भाऊ’ देखिल मदतीला आला नाही ! ‘भावना’अनावर झाल्याने अपमानाचा बदला घेण्याची शक्यता?

अकोला दिव्य न्युज ब्युरो : गेल्या एक, दीड महिन्यांपासून जिल्ह्यात खासदार भावना गवळींच्या उमदेवारीवरून सुरू असलेल्या चर्चांवर अखेर पडदा पडला. मात्र या घडामोडीनंतर महायुतीत आता पाडापाडीचे नवीन नाट्य सुरू होणार आहे. भावना गवळी या पाच वेळा खासदार म्हणून निवडून आल्यानंतरही पक्षाने त्यांची कोणतीही बाजू न ऐकता भाजपच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून डावल्याने या निवडणुकीदरम्यान ‘योग्य’ भूमिका घेवून गवळी या अपमानाचा बदला घेण्याची शक्यता आहे.

वाशिम लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा आणि यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघातून तीनवेळा शिवसेनेच्या खासदार म्हणून भावना गवळींनी लोकसभेत प्रतिनिधीत्व केले आहे. बेधडक स्वभाव, संपर्क, महिलांच्या प्रश्नांप्रती सजगता आणि निवडणुकीच्या वर्षातील सक्रियता, कुणबी मतांचे ध्रुवीकरण, शिवसेनेच्या तळागळातील कार्यकर्त्यांची मजबूत फळी, संजय राठोड यांच्या मदतीने बंजारा समाजाची साथ अशा काही जमेच्या बाजूंमुळे भावना गवळींनी सलग पाचवेळा खासदार म्हणून आपली छाप राजकीय वर्तुळात पाडली आहे. शिवाय २००९ पासून झालेल्या तीन्ही लोकसभा निवडणुकीत प्रत्येकवेळी त्यांचे मताधिक्य ५० हजार ते एक लाखांच्या फरकाने वाढले आहे.

काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, हरिभाऊ राठोड, राष्ट्रवादीचे मनोहराव नाईक आदी मोठ्या नेत्यांना पराभूत करून त्यांनी या मतदारसंघावरील त्यांची पकड मजबूत असल्याचे वेळोवेळी दाखवून दिले. हे सर्व असताना, भाजपने लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या नाराजीचा मुद्दा पुढे केला. त्या आधारे भाजपच्या गोटातून झालेल्या सर्वेक्षणाच्या अहवालांचा आणि ईडीच्या कारवाईचा दाखला देत भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावना गवळींना उमेदवारी न देण्याच्या सूचना केल्याचे सांगण्यात येते.

मुख्यमंत्र्यांनी भावना गवळींना दोन वेळा कामाला लागण्याच्या सूचना केल्यानंतरही ते गवळींना दिलेल्या शब्दावर ठाम राहू शकले नाही.भाजपच्या दबावापुढे झुकत मुख्यमंत्र्यांनी खासदार गवळी यांना उमेदवारी नाकारली आहे. ही बाब भावना गवळी व त्यांच्या समर्थकांना चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्याचे पडसादही जिल्ह्यात ठिकठिकाणी उमटले.भावना गवळींना उमेदवारी नाकरण्यामागे भाजपचा हात नसून, पक्षातीलच एका नेत्याचा हात असल्याचा दावा करून गवळी समर्थकांनी संजय राठोड यांच्याकडे अप्रत्यक्षपणे इशारा केला आहे.

गवळींनी तीन महिन्यांपूर्वीच महायुतीच्या मेळाव्यात ‘मेरी झांसी नहीं दुंगी’ म्हणत दंड थोपटले होते. मात्र आता झांसी (मतदारसंघ) त्यांच्या हातातून निसटल्यानंतर त्यांची भूमिका काय राहते, याकडे दोन्ही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भावना गवळी राखी बांधायच्या. अखेरच्या क्षणी भाऊ धावून येईल, ही अपेक्षा गवळींना होती. मात्र तेही बहिणीच्या मदतीला धावून न आल्याने गवळी सध्या एकाकी पडल्याचे चित्र आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!