अकोला दिव्य न्युज ब्युरो : भाजपची उमेदवारी गृहीत धरून प्रचाररथ वेगाने पुढे नेण्याच्या खासदार नवनीत राणा यांच्या प्रयत्नांना महायुतीमधून मिळालेले आव्हान आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या उघड विरोधामुळे खीळ बसली आहे. बच्चू कडूंनीही विरोधाची धार तीव्र केल्याने राणा दाम्पत्याची चहूबाजूंनी कोंडी झाली आहे.
गेल्या महिनाभरापासून नवनीत राणा यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे. पण, उमेदवारी अर्ज सादर करण्याची तारीख जवळ आली असतानाही प्रवेशाचा मुहूर्त ठरलेला नाही. आठवडाभरापूर्वी आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. भाजपकडून नवनीत राणा यांना कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आल्यास त्याला पक्ष पूर्णपणे पाठिंबा देईल, असा ठराव युवा स्वाभिमान पक्षाने पारीत केला. पण, महायुतीच्या सर्व नेत्यांना एका मंचावर आणून नवनीत राणा यांचा प्रचार करण्यास भाग पाडू, घटक पक्षातील नेत्यांनी विरोधात काम केल्यास कारवाई करण्यास सांगू, असा इशारा रवी राणांनी स्थानिक नेत्यांना दिला, त्यामुळे ठिणगी पडली.
महायुतीतील घटक असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला थेट विरोध करीत स्वतंत्र लढण्याची घोषणा केली. मंगळवारी रात्री उशिरा बच्चू कडू यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. नवनीत राणा या जर उमेदवार असतील, तर प्रहारचा महायुतीतून भाग पडण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा निर्वाणीचा इशाराच बच्चू कडू यांनी दिल्याने राणांच्या अडचणी वाढल्या आहेत.
दुसरीकडे, नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नका, अशी मागणी भाजपच्या वीसहून अधिक पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. मंगळवारी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दोन्ही नेत्यांची नागपुरात भेट घेतली. राणा दाम्पत्याच्या कार्यप्रणालीबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांचा स्वभाव सर्वांना सोबत घेऊन चालणारा नाही. स्थानिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना विश्वासत घेतले जात नाही. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत विचार व्हावा, अशी भूमिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. त्यामुळे भाजपमधील धुसफूस उघड झाली आहे.