अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीत आजपर्यंत कधीही दिसून न आलेली अनिश्चितता यंदा प्रकर्षाने जाणवत आहे.महाविकास आघाडीवर भाजपामहायुती टक लावून बघत आहे.तर महायुतीतील संभाव्य उमेदवारांच्या अनुषंगाने मविआ जाळं टाकत आहे. अँड प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा यंदा मविआमध्ये समावेश होणार, असं सगळ्यांना वाटत असताना, आज बुधवार २७ मार्चला अँड. आंबेडकर यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस उमेदवार ठाकरे यांना समर्थन देऊन आपले आठ उमेदवार जाहीर केले. तर कॉंग्रेसकडून अकोला वगळून विदर्भातील सर्वच उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.ही बाब लक्षात घेता, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसांपर्यंत काहीही होऊ शकतं
विशेष म्हणजे सर्वात आधी दोन जागा शिवसेनेनी जाहीर केल्या. त्यानंतर दोन टप्प्यात कॉंग्रेसकडून ११ उमेदवार जाहीर करण्यात आले.आज शिवसेना उबाठा गटाने १७ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही पहिल्या टप्प्यासाठी आपल्या 8 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोला येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, वंचित बहुजन आघाडीच्या राज्यसमितीची काल बैठक घेतली. या बैठकीत आगामी निवडणूक लढण्यासंदर्भात आम्ही काही निर्णय घेतले आहेत.आमच्याबरोबर जे आघाडी करण्यासाठी इच्छूक होते. त्यांना आम्ही सांगितले की,महाराष्ट्रातील जरांगे पाटील फॅक्टर लक्षात घ्यावा. पण तो फॅक्टर लक्षात घेतला गेला नाही. जरांगे पाटील यांच्यासह काल आमची बैठक झाली. पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्याची मुदत संपत आहे. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी विचार विनिमय करून अर्ज करण्याचे आमचे ठरले आहे.प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी महाविकास आघाडीतून ते बाहेर पडले आहेत का? याबाबत त्यांनी उत्तर देणे टाळले. आज फक्त उमेदवारांची घोषणा करत आहे. प्रश्नोत्तरांना उद्या उत्तर देईल, असेही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगतिले.
वंचित बहुजन आघाडीने खालील उमेदवारांची आज घोषणा केली
भंडारा-गोंदिया – संजय गजानन केवट
गडचिरोली-चिमूर – हितेश पांडुरंग मढावी
चंद्रपूर – राजेश बेले
बुलढाणा – वसंत मगर
अकोला – प्रकाश आंबेडकर
अमरावती – प्राजक्ता पिल्लेवान
वर्धा – प्रा. राजेंद्र साळुंखे
यवतमाळ-वाशिम – खेमसिंग प्रतापराव पवार