अकोला दिव्य न्युज ब्युरो : अमरावती लोकसभा मतदारसंघात विद्यमान अपक्ष खासदार नवनीत राणा यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात येईल, अशी दाट शक्यता वर्तविण्यात येत असताना अद्याप त्यांचे नाव जाहीर झाले नाही. कारण सुप्रीम कोर्टात त्यांच्या जातप्रमाणपत्रबाबतचा निकाल राखून ठेवल्याने पेच निर्माण झाला आहे. भाजपाने यामुळे सावध भुमिका घेत, उद्योजिका कल्पना सरोज यांच्या पर्यायी उमेदवार म्हणून विचार केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती मिळण्याचा कुठलाही पर्याय नसल्याने नवनीत कौर राणा यांचे राजकीय आयुष्य सध्या डावावर लागले आहे,
अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपाच निवडणूक लढविणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. भाजप उमेदवार म्हणून नवनीत राणा यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. त्यांचा भाजपात प्रवेश करुन घेऊन उमेदवारी जाहीर करण्यात येईल. परंतु खासदार नवनीत कौर राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यावर न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्या. संजय करोल यांनी राखून ठेवलेला निकाल १ एप्रिलनंतर कधीही लागण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने, सावधगिरी म्हणून भाजपाने त्यांचा पक्ष प्रवेश आणि उमेदवारी जाहीर करणे टाळले आहे. वर्ष २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. निवडणूकीत विजयी झाल्यानंतर राणा यांनी भाजपाची कास धरली.
भाजपला समर्पित झालेल्या नवनीत राणा यांचा भाजपमध्ये प्रवेश करुन घेऊन त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी फडणवीस यांनी शिंदे गटाकडून अमरावतीची जागा भाजपसाठी सोडून घेतली.पण नवनीत कौर राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यावर निकाल राखून ठेवलेला असल्याने उमेदवारी जाहीर करावी की नाही या पेचात भाजपा अडकलेली आहे. तर सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्या. संजय करोल यांनी राखून ठेवलेला निकाल १ एप्रिलनंतर कधीही लागण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने हा निकाल राणा यांच्या विरोधात गेला तर ‘हिट विकेट’ होईल आणि सुंठी वाचून खोकला गेला, म्हणून शिंदे गटाला अडसूळ यांच्या उपचारासाठी दबाव आणता येईल. सध्या सर्व जर-तर असून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती मिळण्याचा कुठलाही पर्याय नाही. यामुळे नवनीत कौर राणा यांचे राजकीय आयुष्य डावावर लागले आहे, एवढं निश्चित आहे.