अकोला दिव्य न्युज ब्युरो : मनोज जरांगे पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार द्यायचा की नाही, हे समाजाशी बोलून ३० तारखेला निर्णय घेण्याची भूमिका मांडली आहे. याच पार्श्वभूमीवर माविआसोबत जागा वाटप अंतिम होत नसलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी मध्यरात्री अंतरावाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेवून जवळपास दीड तास चर्चा केली. लाेकसभा निवडणुकीसह इतर बाबींवर ही चर्चा झाली.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २४ मार्च रोजी समाजाची राज्यव्यापी बैठक घेवून चर्चा केली होती. गावा- गावातून उमेदवार देण्याऐवजी प्रत्येक मतदार संघातून एक अपक्ष उमेदवार द्यावा. त्यातही प्रत्येक जाती-धर्माचा उमेदवार द्यावा, असा सल्ला जरांगे पाटील यांनी दिला होता. सोबतच गावा-गावात समाजाची बैठक घेवून समाजाचा होकार किंवा नकार टक्केवारीत कळवा अपक्ष उमेदवार देण्याबाबत ३० तारखेला निर्णय घेवून असे जरांगे पाटील म्हणाले होते.
मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला दोन दिवस जातात न जातात तोच वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी रात्री ११:४५ वाजण्याच्या सुमारास अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेवून चर्चा केली. जवळपास दीड तास चाललेल्या या चर्चेत मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा, लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली.
भेट झाली म्हणजे सकारात्मक चर्चा: आंबेडकर
लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. लोकसभा निवडणुकीसह पुढील वाटचाल कशी करायची ? यासह इतर विषयांवर चर्चा झाली. संयुक्त निवडणूक लढायची का ? यावर मात्र वेळ येईल त्यावेळी सांगू. आम्ही भेटलो म्हणजे सकारात्मक चर्चा झाली, असे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.