Friday, November 22, 2024
Homeसामाजिकआत्महत्या ! मृत्यूचे 9 वे कारण : वैद्यकशास्त्रातील सुसंगत कारणांवर गंभीरपणे उपाय...

आत्महत्या ! मृत्यूचे 9 वे कारण : वैद्यकशास्त्रातील सुसंगत कारणांवर गंभीरपणे उपाय योजना गरजेचे

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : प्राचीन हिंदू धर्मामध्ये ‘आत्महत्या’ म्हणजे एक प्रकारे या विश्वातील देवांचे अस्तित्व नाकारणे असून.’आत्महत्या’ हे पाप आहे.असे ठाम मत व्यक्त केले गेले आहे. तर जगाच्या पाठीवरील बहुतेक देशामध्ये आत्महत्या हे कृत्य एक प्रकारे गुन्हाच मानला जातो. भारतात आत्महत्या असफल झाली तर व्यक्तिस गुन्हेगार मानले जाते.मात्र प्रगत वैद्यकशास्त्राच्या मते व्यक्तिचे मानसिक आरोग्य आणि आत्महत्या करणे, याचा परस्परसंबंध असतोच. मात्र समाज, गाव, शहर, जिल्हा राज्य आणि देशपातळीवर प्रसिद्ध किंवा चर्चित व्यक्तीने आत्महत्या केली तरच, आत्महत्येच्या घटनेला घेऊन चर्चा केली जाते.परंतु दुर्दैवाने व्यक्त होणारे विचार पाप-पुण्य आणि गेलेल्या व्यक्तीच्या खाजगी जीवनाचे खोदकाम करणारेचं ! या चराचरातील कुठल्या ‘योनी’ आणि जात,पंथ व धर्मात जन्माला येणं जसं आपल्या हातात नाही. तसंच कोणत्या मार्गाने या जगाचा निरोप (मृत्यू) घेणेही कोणाच्या हातात नाही, हे देखील सांगितले असतानाही, ‘आत्महत्या’ झाली की, धर्मशास्त्राचा दाखल देऊन ‘त्या’ मृत्यूला हीन बुध्दीने बघण्यापेक्षा, प्रगत वैद्यकशास्त्रात सांगितलेल्या आत्महत्येच्या अत्यंत सुसंगत कारणांवर गंभीरपणे विचार का केला जात नाही. वाढत्या प्रमाणात होत असलेल्या आत्महत्या धोक्याची घंटा असून, आज मृत्यूचा कारणात आत्महत्या 9 वे कारण झाले आहे.

आत्महत्येच्या विचारांबाबत लोकांमध्ये अनेक प्रकारच्या गैरसमजूती आहेत. सामान्यांचा गैरसमज आहे की, विचार किंवा परिस्थिती गंभीर होईपर्यंत लोकांच्या मनात आत्महत्येचा विचार येत नाही. हताश अथवा तीव्र निराशा यांना तोंड न देता आल्यामुळे एखाद्याचे मानसिक आरोग्य बिघडते. तसेच, सामाजिक तणाव, खाजगी आयुष्य, वैवाहिक जीवनातील दुरावा, अहंकार (इगो), आर्थिक नुकसान, फसवणूक, विद्यार्थ्यांच्या संदर्भात शैक्षणिक, नैतिक व पालकांच्या अपेक्षांचे न पेलविणारे तणावही कारणीभूत ठरतात. हे राजस्थान राज्यातील कोटा शहरातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येने अधोरेखित झाले आहे. कही जणांकडून आत्महत्येचे केवळ प्रयत्नच केले जातात. परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. विशेषतः, विद्यार्थीदशेतील हे प्रयत्न भविष्यात धोकादायक ठरू शकतात. त्यांची मरण्याची इच्छा नसते. त्यामुळे प्रयत्न फसतो. तेव्हा त्वरीत उपाय करणे व त्यांना मदत करणे आवश्यक असते. योग्यवेळी योग्य प्रकारचे समुपदेशन मिळाल्यास ते भविष्यात आत्महत्येचे प्रयत्न करत नाहीत.

जगामध्ये १९६० ते २०२२ पर्यंत आत्महत्येचा दर ६०% ने वाढला आहे. जागतिक पातळीवर आत्महत्या हे मृत्युचे ९ वे कारण ठरले आहे. जगात सर्वाधिक आत्महत्या या दक्षिण पूर्व आशिया विभागात होतात. जगभरात ज्या तरूणांच्या आत्महत्या होतात त्यापैकी १०% आत्महत्या एकट्या भारतात होतात. २०२२ मध्ये देशात सर्वाधिक आत्महत्या झाल्या होत्या. दर ४० सेकंदाने भारतात एक आत्महत्या होत असल्याचे म्हटले आहे. (संदर्भ: जागतिक आरोग्य संघटना) युवा पिढीमध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक वाढण्यामागे अनेक कारणे असले तरी नैराश्याचं शेवटचं टोक म्हणजे आत्महत्या असा सर्वसाधारण समज आहे.

नकारात्मक विचार प्रत्येकाच्या डोक्यात येतात. काहीवेळा मनात येणारा विचार काही क्षणांचा असतो. तर, काही लोकांमध्ये हळूहळू नकारात्मकता वाढत जाऊन हे विचार वाढतात. मानसिक आजारांबद्दल अजूनही अनेक गैरसमज असल्याने मोकळेपणाने बोलणं लोक टाळतात.आत्महत्येचा विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीत वॉर्निंग साईन (धोक्याची सूचना) असतातच असं नाही. पण बऱ्याचदा लोक त्यांच्या भाषेतून किंवा कृतीतून अशा साईन्स देत असतात.नेहमी हसमुख किंवा लोकांमध्ये मिसळणारा व्यक्ती अचानक एकटा राहू लागला, अबोल झाला. सिगारेट किंवा मद्यपान अधिक प्रमाणात सुरू होणं. हे व्यक्तीत होणारे बदल आहेत. सतत निराशावादी बोलणं, मृत्यूची भाषा करणं, ही काही आजाराची लक्षणं आहेत. एखाद्याच्या आयुष्यातल्या या बदलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे.अशावेळी मानसिक आरोग्याबाबत समुपदेशन करणाऱ्या हेल्पलाईन महत्त्वाची भूमिका बजावतात.

तो यशस्वी होता तरी त्यांनी आत्महत्या केली? अपयश इतका परिणाम करतं ? असा लोकांचा प्रश्न आहेच. सामान्यत: आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरूषांचं प्रमाण जास्त आहे, करोनासंसर्गाच्या काळात आणि करोनानंतर बिझनेस चांगला नाही, घरची भांडणं, आर्थिक चणचण, आर्थिक सुबत्ता व सुरक्षा, मुलांच करिअर, शिक्षण इत्यादी विचारांनी लोकांच्या मनात आत्महत्येचा विचार जास्त येत असल्याचे दिसून येते आहे. या कारणाने आत्महत्येचा विचार करणाऱ्यांमध्ये पुरूषांची संख्या जास्त आहे. तर, कौटुंबिक संबंधात स्त्रियांमध्ये आत्महत्येच्या विचारांचं प्रमाण जास्त आहे. बहुतेक प्रकरणात आत्महत्या करुन चुकलेल्यांनी कोणालाही मागसुम लागू दिला नाही. कारण आत्महत्या हे पाप आहे आणि ते करु नये, हा ठसा उमटविला गेला असल्यानेच, हे टोकाचे पाऊल उचलत असल्या बाबत कोणीही व्यक्त होत नाही. तेव्हा ‘पाप-पुण्य’ च्यावर जाऊन आत्महत्येच्या विचारातून बाहेर आणण्यासाठी गाव शहर जिल्हा पातळीवर 24 तास सुसाइड हेल्पलाईनची मदत, समुपदेशन, सकारात्मक विचार व वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी सामाजिक संस्था, संघटनांनी एकत्र येऊन काम केले तरच काही प्रमाणात आत्महत्येच्या घटनांवर अंकुश येईल.

या संदर्भात काही मानसिक आरोग्य तज्ज्ञ आणि समुपदेशक यांच्यासोबत चर्चा करून संभाव्य कारणे आणि उपाय यांची सांगड घालून तुलनात्मक विश्लेषण लिहित असताना, प्रकर्षाने जाणवते की, मानसिक रुग्ण झपाट्याने वाढत आहे. ही सुदृढ समाजासाठी चिंतेची गोष्ट आहे. शहरातील समुपदेशक संगीता राव (नाव बदललेलं) आत्महत्येच्या विचारापासून प्रवृत्त झालेल्या एका महिलेचं उदाहरण देतात. त्या म्हणतात, “एका महिलेची घटस्फोट प्रक्रिया सुरू होती. डिप्रेशनवर उपचार सुरू होते. मी यातून कशी बाहेर पडू? मला आत्महत्येचा विचार येतोय ती वारंवार सांगायची. पण, आता ती एका मोठ्या कंपनीत कामाला आहे. थॉट मॉडिफिकेशन, चिडचिडेपणा कमी करण्याच्या टेक्निकचा तिला फायदा झाला. त्या सांगतात, तुम्ही तुमचे जर विचार कोणाला सांगू शकत नाहीत. तर, लिहून काढा. जेणेकरून तुम्ही पॉझिटिव्ह विचार करू शकता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!