अकोला दिव्य न्युज ब्युरो : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून कोणाला तिकीट मिळणार, हा बहुप्रतीक्षित प्रश्न अखेर काल निकाली निघाला. खासदारपदी असताना निधन झालेल्या बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि विद्यमान काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे लेक शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी फील्डिंग लावणारे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची निराशा झाली. तिकीट मिळाल्यानंतर प्रतिभा धानोरकर पहिल्यांदा नागपुरात आल्या. यावेळी त्यांचं स्वागत करताना कार्यकर्ते, पदाधिकारी, सहकारी, कुटुंबीय यांच्यासह खुद्द प्रतिभाताईही भावूक झाल्या. त्यानंतर सर्वांचे आभार मानले.
मुलाला घट्ट मिठी
वणीची लेक आणि चंद्रपूरच्या सूनबाई काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर दिल्लीहून परतल्यावर नागपुरात जंगी स्वागत करण्यात आलं. प्रतिभाताईंची त्यांच्या मैत्रिणी, कुटुंबीय, सहकारी महिला पदाधिकारी-कार्यकर्तींनी गळाभेट घेतली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. अगदी लेकानेही त्यांना गच्च मिठी मारली असता दोघांच्या डोळ्यात आसवं दाटून आली. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक निर्णयात मला त्यांची उणीव जाणवणार आहे, असं सांगताना प्रतिभाताईंनी आवंढा गिळल्याचं कोणाच्याही नजरेतून सुटलं नाही.
लढाई कठीण, समोर तगडा उमेदवार
पतीच्या निधनानंतर ही जबाबदारी माझ्या खांद्यावर आली. त्यांनी सर केलेला हा गड मी कायम राखीन, हा विश्वास मला वाटतो. सुधीरभाऊ मुनगंटीवार हे राजकारणातले दिग्गज नेते माझ्यासमोर आहेत. राजकारणाचा दांडगा अनुभव त्यांना आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही लढाई सोपी नाही. ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी लढाई आहे. संघर्षाशिवाय माणूस मजबूत होत नाही. जितना संघर्ष बडा, उतनी लढाई शानदार, असं मी स्टेटस ठेवलं होतं. ही लढाई वैयक्तिक नाही. राजा बोले प्रजा हाले असा काँग्रेस पक्ष नाही, असंही प्रतिभाताई म्हणाल्या.