अकोला दिव्य न्युज ब्युरो : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली राऊस एव्हेन्यु कोर्टाने २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. काल (२१ मार्च) अटक झाल्यानंतर त्यांना आज राऊस एव्हेन्युक कोर्टात सादर करण्यात आलं. त्यांच्या बाजून अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू लढवली. तर, ईडीने त्यांच्या १० दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, कोर्टाने त्यांना सहा दिवसांची कोठडी दिली आहे.
आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री उशिराने ईडीने अटक केली. या अटकेविरोधात आपने लागलीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसंच, तातडीच्या सुनावणीचीही मागणी करण्यात आली होती. परंतु, आज (२२ मार्च) आपने ही याचिका मागे घेतली. त्यानंतर, ईडीने अरविंंद केजरीवाल यांना ट्रायल कोर्टात हजर केले.दिल्लीच्या ट्रायल कोर्टात आज सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूने जोरदार युक्तीवाद करण्यात आला. न्यायमूर्तींनी दोन्ही बाजू ऐकून घेतली. आज सायंकाळीच सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला होता. त्यानंतर, आता कोर्टाने निकाल जाहीर केला असून २८ मार्चपर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे.
रिमांड सुनावणी दरम्यान, ईडीने आरोप केला की केजरीवाल यांना दिल्ली मद्य धोरण २०२१-२२ तयार करण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी साऊथ ग्रुपकडून अनेक कोटी रुपये लाच म्हणून मिळाले आहेत. ईडीतर्फे हजर असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) एसव्ही राजू यांनी राऊस अव्हेन्यू कोर्टात सांगितले की, “केजरीवाल यांनी गोव्याची निवडणूक लढवण्यासाठी साऊथ ग्रुपमधील काही आरोपींकडून १०० कोटी रुपयांची मागणी केली होती.गोवा निवडणुकीत वापरलेले ४५ कोटी रुपये लाच चार हवाला मार्गांवरून आल्याचे मनी ट्रेलवरून दिसून येते, असा दावाही राजू यांनी केला.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या इतिहासात एका विद्यमान मुख्यमंत्र्यांना अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे, त्यांच्या पक्षाच्या चार नेत्यांना अटक करण्यात आली आहे, याकडेही ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी लक्ष वेधले