अकोला दिव्य न्युज ब्युरो : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांचा तपशील गुरुवारी आपल्या संकेतस्थळावर जाहीर केला. यात केवळ २० कंपन्यांनी तब्बल ५ हजार ४२० कोटी रुपयांचे (एकूण रक्कमेच्या ४४.५९ टक्के) निवडणूक रोखे खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. यात फ्युचर गेमिंग व मेघा इंजिनियरिंग यांनी एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२४ या काळात सर्वाधिक रोखे घेतले होते.
दक्षिण भारतातील ‘लॉटरी किंग’ सँटिएगो मार्टिन याच्या ‘फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस’ या कंपनीने १ हजार ३६८ कोटींचे रोखे खरेदी केले. तर आंध्र प्रदेशातील पी. व्ही. कृष्णा रेड्डी आणि पी. पी. रेड्डी या भावांच्या मेघा इंजिनियरिंग या बांधकाम क्षेत्रातील कंपन्या नावे ९६६ कोटींच्या रोख्यांची खरेदी झाली आहे. अनिल अग्रवाल यांच्या मालकीच्या वेदांत लिमिटेड या खाणकाम उद्याोगातील कंपनीचाही सर्वात मोठ्या २० खरेदीदारांमध्ये समावेश आहे. अर्थपुरवठा क्षेत्रातील चार कंपन्यांनी १२३ कोटींचे रोखे गेल्या पाच वर्षांत खरेदी केले आहे. यात बजाज फायनान्स, पिरामल एन्टरप्रायझेस, एडलवाईज व सुवर्णतारण अर्थपुरवठादार मुत्थुट फायनान्स यांचा समावेश आहे. मात्र या कंपन्यांनी रोख्यांच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला देणग्या दिल्या आहेत, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
कंपन्यांकडे विचारणा केली असता लगेचच माहिती मिळू शकली नसल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.निवडणूक रोखे खरेदी केलेल्या कंपन्यांप्रमाणेच रोखे वठविलेल्या राजकीय पक्षांची तारीखवार यादीही निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. यात अपेक्षेप्रमाणे भाजपला सर्वात जास्त देणग्या मिळाल्या आहे, तसेच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, भारत राष्ट्र समिती आदी पक्षांना देणग्या मिळाल्या आहेत.
सर्वांत मोठे १० खरेदीदार
●फ्युचर गेमिंग : १,३६८ कोटी
●मेघा इंजिनियरिंग : ९६६ कोटी
●क्विक सप्लाय चेन : ४१० कोटी
●वेदांत लि. : ४०० कोटी
●हल्दिया एनर्जी : ३७७ कोटी
●भारती समूह : २४७ कोटी
●एस्सेल मायनिंग : २२४ कोटी
●वेस्टर्न यूपी पॉवर ट्रान्समिशन : २२० कोटी
●केवेंटर फूडपार्क इन्फ्रा : १९४ कोटी
●मदनलाल लि. : १८५ कोटी