अकोला दिव्य न्युज ब्युरो : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) गटाचे आमदार निलेश लंके आज, गुरुवारी सायंकाळी पुण्यामध्ये शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. यावेळी आमदार लंके यांची नगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होण्याचीही दाट शक्यता व्यक्त केली जाते. आमदार लंके यांचे निकटचे समर्थक व शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून याला दुजोरा मिळत आहे.
विशेष म्हणजे नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपने खासदार डॉ. सुजय विखे यांची उमेदवारी कालच, बुधवारी जाहीर केल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी आमदार लंके यांचा प्रवेश घडत आहे. त्यामुळे यामागे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची खेळी असल्याचे मानले जाते. शरद पवार व विखे कुटुंबीयात राजकीय पूर्व वैमनस्य आहे. त्यातूनच विखे यांच्या विरोधात सक्षम उमेदवार उभा करण्यासाठी पवार यांनी ही चाल खेळल्याचे बोलले जाते.
आणखी विशेष बाब म्हणजे, गेल्या महिनाभरापासून आमदार लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे. आमदार लंके यांनी वेळोवेळी त्याचा इन्कार केला. मात्र आता ते प्रवेश करत असल्याचे उघड होत आहे. राष्ट्रवादी एकत्रित असताना आमदार लंके यांचे शरद पवार, सुप्रिया सुळे, व अजित पवार या तिन्ही नेत्यांशी घनिष्ठ संबंध होते. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर ते प्रथम शरद पवार गटात गेले, नंतर काही दिवसांतच अजितदादा गटात परतले, आता पुन्हा शरद पवार गटात जात आहेत.
आमदार लंके पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे पारनेर तालुकाध्यक्ष होते. तत्कालीन शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या विरोधात बंडखोरी केल्याच्या प्रकरणातून त्यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले व पारने-नगर विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. गेल्या काही दिवसांपासून ते लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यादृष्टीने लोकसभा मतदारसंघात त्यांनी कार्यक्रमही आयोजित केले. या कार्यक्रमातून ते लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे संकेत मिळत होते. परंतु आमदार लंके स्पष्टपणे उघड भूमिका घेत नव्हते. मात्र त्यांची वाटचाल त्या दृष्टीने सुरू होती. या वाटचालीतूनच आमदार लंके व खासदार विखे यांच्यामध्ये राजकीय वैमनस्य निर्माण झाले.