अकोला दिव्य न्युज ब्युरो : सुप्रीम कोर्टाने काल झालेल्या सुनावणीदरम्यान खडसावत मंगळवारी सायंकाळपर्यंत निवडणूक रोख्यांचे तपशील निवडणूक आयोगाला पाठवा, अशा सूचना दिल्यानंतर आज भारतीय स्टेट बँकेने निवडणूक रोख्यांची माहिती निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केली आहे. भारतीय स्टेट बँकेने सायंकाळी साडेपाच वाजता ही माहिती निवडणूक आयोगाला दिल्याचे समजते. निवडणूक रोख्यांबाबतच्या माहितीतून आता नेमकी काय आकडेवारी समोर येते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलं आहे.
निवडणूक रोख्यांचा तपशील सादर करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेने सुप्रीम कोर्टाकडे ३० जूनपर्यंतची मुदत वाढवून मागितली होती. मात्र १२ मार्चच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत बँकेने भारतीय निवडणूक आयोगाकडे हा तपशील सादर करावा आणि आयोगाने १५ मार्चला सायंकाळी ५ वाजेपर्यंत संकेतस्थळावर हा तपशील प्रसिद्ध करावा. गेल्या २६ दिवसांत तुम्ही काय केले? अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने एसबीआयला काल झालेल्या सुनावणीत फटकारलं होतं.
एसबीआयने रोख्यांची माहिती निवडणूक आयोगाला ६ मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने १५ फेब्रुवारीला दिले होते, पण १२ एप्रिल २०१९ ते १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंतच्या २२ हजार २१७ रोखे निवडणूक रोख्यांविषयीची माहिती डिजिटल स्वरूपात साठवलेली नाही. ती उपलब्ध करून देण्यास वेळ जाणार असल्याने ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी एसबीआयने केली होती.
मुदतीचे पालन न केल्यास अवमान
निवडणूक रोख्यांसंबंधात जो तपशील द्यायचा आहे, ते स्टेट बँकेकडे सहज उपलब्ध आहे. निवडणूक रोख्यांसंबंधीची माहिती तंतोतंत जुळावी, असे आम्ही सांगितलेले नव्हते. दिलेल्या आदेशाची तुम्ही अंमलबजावणी करा. तुम्हाला फक्त सीलबंद असलेली माहिती निवडणूक आयोगाकडे पाठवायची आहे. मुदतीत आदेशांचे पालन न केल्यास हा कोर्टाचा हेतुपुरस्सरपणे केलेला अवमान समजून कारवाई केली जाईल, असा सज्जड दम कोर्टाने दिला होता.