Saturday, November 23, 2024
Homeताज्या घडामोडीअकोल्यातील कर वसुली कंत्राटचा तातडीने अहवाल द्या ! अवर सचिवांचा आदेश, देव...

अकोल्यातील कर वसुली कंत्राटचा तातडीने अहवाल द्या ! अवर सचिवांचा आदेश, देव यांचे यशस्वी आंदोलन

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला शहरातील मालमत्तेच्या कर वसुलीसाठी खाजगी कंत्राटदाराला कंत्राट देताना अनियमितता झाली का ? यासोबतच ज्या कामासाठी निविदा काढण्यात आली ते मालमत्ता पुनर्मुल्यांकनाचे काम स्थगित का, निविदा प्रक्रियेत तत्कालिन आयुक्तांनी काही अनियमितता केली का? या अनुषंगाने चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल शासनाला द्यावा. खाजगीकरणामुळे महापालिका कर्मचाऱ्यांना काही काम राहिले की नाही याची खातरजमा करावी. त्याच बरोबर नागरिक स्वयंस्फुर्तीने कर भरत असताना कर वसुलीखाजगीकरण का केले गेले. आता खाजगीकरणातून कर वसुलीची रक्कम किती जमा होत आहे. दोनच निविदा असताना टेंडर कसे देण्यात आले. कर वसुलीचा अनुभव नसताना स्वाती इंडस्ट्रिजला कर वसुलीचे कंत्राट का देण्यात आले या सर्व विषयाची माहिती राज्य शासनाला द्यावी. या विषयी आंदोलन करणारे वंचितचे युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते नीलेश देव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची गंभीर दखल घेत अकोलेकरांना दिलासा द्यावा असे आदेश नगर विकास विभागाच्या अवर सचिव विद्या हमप्या यांनी महापालिका आयुक्त सुनिल लहाने यांना दिले आहे.
अकोला महापालिकेच्या कर वसुली खाजगीकरणाविरोधात गुरुवार ७ मार्च पासून मुंबईत आंदोलन करणाऱ्या वंचित युवानेता आणि सामाजिक कार्यकर्ता निलेश देव यांचे आंदोलन नगर विकास विभागाच्या अवर सचिव विद्या हमप्या यांनी मध्यस्थी करत सोडविण्यात आले. नगर विकास विभागाच्या अवर सचिव यांनी मुंबईतून महापालिका आयुक्त सुनिल लहाने यांच्याशी संवाद घडवून आणला. त्याच बरोबर नीलेश देव यांना हवी असलेली सर्व माहिती लोकहितास्तव उपलब्ध करुन देत त्यांच्या रास्त मागण्याची दखल आयुक्तांनी घ्यावी असा आदेश नगर विकास विभागाच्या अवर सचिव यांनी आयुक्तांना दिला आहे. नीलेश देव यांचे कर वसुली खाजगीकरणा विरोधात हे यशस्वी आंदोलन असल्याची चर्चा मुंबई तसेच अकोल्यातील राजकीय वर्तुळात सुरु आहे.
अकोला महापालिका मालमत्ता कर खासगीकरणाविरोधात राज्य सरकारची ढिसाळ भूमिका आणि त्याच बरोबर अकोल्यातील जनतेवर लादलेले कर वसुली खासगीकरण दूर करण्यासाठी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यास गेलेले नीलेश देव व त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांना मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अटकाव केला. त्यांना काही काळ स्थानबध्द करण्यात आले. अखेर आझाद मैदान पोलिसांना नीलेश देव यांना सुपूर्द करत त्यांना आझाद मैदानात आंदोलन करण्यास काही अटी घालत परवानगी दिली होती. अखेर नीलेश देव यांनी त्यांच्या सोबत उपस्थित कार्यकर्ते नीलेश पवार, अजय शास्र्ती, राजु गुन्नलवार, राजु कनोजीया यांच्यासोबत आझाद मैदानात गेल्या गुरुवारपासून आंदोलन केले. आंदोलनस्थळी अकोलेकरांनी गर्दी करत त्यांना पाठिंबा दिला.

मुख्यमंत्र्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन न करण्याची मागणी नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी नीलेश देव यांना केली होती. आज नगर विकास विभागाच्या अवर सचिव विद्या हमप्या यांनी त्यांच्या दालनात वंचित निलेश देव यांच्याशी अर्धा तास चर्चा करत या विषयाचे गांभीर्य समजुन घेतले. अकोलेकरांवर नाहक कर वसुलीचा बोजा चढविण्यात आल्याचे नीलेश देव यांनी शासनाच्या लक्षात आणुन दिले. अखेर नगर विकास विभागाच्या अवर सचिव विद्या हमप्या यांनी अकोला महापालिका आयुक्त सुनिल लहाने यांच्यासोबत विद्या हमप्या यांनी दूरध्वनीवर संपर्क साधत नीलेश देव यांच्या आंदोलनाची शासनाने गंभीर दखल घेतल्याचे सांगितले. महापालिका आयुक्तांनी नीलेश देव यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर द्यावीत त्याच बरोबर शासनाला या विषयी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. निलेश देव यांचे पाच दिवसांपासून मुंबईत कार्यकर्त्यांसह सुरु असलेले आंदोलनास यश प्राप्त झाल्यानंतर ते आज स्थगित करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!