अकोला दिव्य न्युज ब्युरो : विविध वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे आमदार संजय गायकवाड यांनी वनासंदर्भात केलेले विधान त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपवनसंरक्षक सरोज गवस यांनी याला दुजोरा दिला.
स्थानिक माध्यमांना प्रतिक्रिया देताना आमदार संजय गायकवाड यांनी, मी १९८७ साली वाघाची शिकार केल्याचे विधान केले होते. तसेच वाघाची शिकार करून वाघाचा दात गळ्यात घालत असल्याचे त्यांनी सांगितले होते. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. वन विभाकडून यावर लगेच प्रतिक्रिया आली नाही. मात्र, आता याप्रकरणी वन खात्याने गुन्हा दाखल केला आहे.
वन विभागाने आमदार संजय गायकवाड यांच्याकडील कथित वाघ दंत ताब्यात घेतला असून तो न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. न्याय वैद्यक प्रयोग शाळेतून अहवाल आल्यावर आमदार संजय गायकवाड यांच्यावर पुढील कारवाई होणार आहे.