चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत झालेल्या गैरप्रकाराबद्दल सुप्रीम कोर्टाने निवडणूक अधिकाऱ्याला दणका देत बाद करण्यात आलेली आठ मते वैध ठरवत आम आदमी पक्षाच्या उमेदवाराची महापौर म्हणून घोषणा केली आहे. तसंच निवडणूक अधिकाऱ्यावर खटला चालवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा विजय झाल्यानंतर आपच्या उमेदवाराने कोर्टात धाव घेतली होती. या सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीशांनी काल निवडणूक अधिकारी अनिल मसीह यांना प्रश्न विचारत फटकारलं होतं. त्यानंतर आज पुन्हा याप्रकरणी सुनावणी झाली. ‘निवडणूक अधिकाऱ्याने क्रॉस मार्क केलेली सर्व मते याचिकाकर्ते कुलदीप कुमार यांच्या बाजूची होती. मात्र निवडणूक अधिकाऱ्याने आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन काम केलं,’ असं निरीक्षण आज कोर्टाने नोंदवलं.
तुम्ही काही मतपत्रिकांवर इंग्रजी ‘एक्स’ अक्षरात खूण केली की नाही, असा थेट प्रश्न कोर्टाने चंडीगड महापौर निवडणूक अधिकारी अनिल मसीह यांना काल विचारला होता. त्यावर मसीह यांनी अवैध ठरलेल्या आठ मतपत्रिकांवर खूण केल्याचे मान्य केले. त्यामुळे मतपत्रिकांशी छेडछाड केल्याचे स्पष्ट झाल्याने मसीह यांच्यावर खटला भरावा, असे मत सर्वोच्च न्यायालयाने काल व्यक्त केले होते. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीदरम्यान आधी कोर्टाने महापौर निवडणुकीच्या मतांची पुन्हा मोजणी केली जावी आणि जी ८ मते निवडणूक अधिकाऱ्याने क्रॉस चिन्ह काढून अवैध ठरविली होती ती वैध धरण्यात यावीत, असे सांगितले होते. त्यानंतर थोड्या वेळापूर्वीच सुप्रीम कोर्टाकडून आप उमेदवार आणि याचिकाकर्ते कुलदीप कुमार यांना महापौर म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
महापौर निवडणुकीत काय घडलं होतं?
चंडीगड महापौरपदासाठी नव्याने निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका ‘आप’ने पंजाब, हरयाणा हायकोर्टात केली होती. त्यावर अंतरिम दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिला. या आदेशाविरोधात ‘आप’चे नगरसेवक कुलदीपकुमार यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. ३० जानेवारी रोजी झालेल्या या निवडणुकीत आप-काँग्रेस आघाडीचा पराभव करून भाजपने आपला उमेदवार महापौरपदी निवडून आणला होता.
भाजपच्या मनोज सोनकार यांना १६ तर ‘आप’चे उमेदवार कुलदीपकुमार यांना १२ मते मिळाली होती. या निवडणुकीबाबत गदारोळ झाल्यानंतर सोनकार यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला होता. सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये या अधिकाऱ्याने बॅलेट पेपरवर क्रॉस करून मते बाद ठरविल्याचे कबुल केले होते. त्याला असे करताना तुम्ही कॅमेराकडे का पाहत होता, असे विचारले असता त्यांनी कॅमेराच्या दिशेने खूप आवाज येत होता, म्हणून मी तिकडे पाहत होतो, असे सांगितले आहे. मतांवर क्रॉस कोणत्या अधिकारातून केले, असे विचारले असता या अधिकाऱ्याने मी आठ मतांवर क्रॉस चिन्ह लिहिले होते. आम आदमी पक्षाच्या महापौर उमेदवाराने येऊन मतपत्रिका हिसकावून फाडून पळ काढला, असे उत्तर दिले होते.