अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर रामभक्त रामललाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. आतापर्यंत लाखो भाविकांनी रामदर्शन घेतले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक रामललाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत पोहोचत आहेत. यातच आता राम मंदिरात रामलला प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी नवीन व्यवस्था लागू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येतील राम मंदिरात रामललाची सकाळी केली जाणारी मंगला आरती आता पहिल्यांदाच पडदा हटवून सुरु करण्यात आली आहे. ही परंपरा कोणत्याही वैष्णव मंदिरात अस्तित्वात नाही. मात्र, राम मंदिरात आता मंगला आरतीचा लाभ भाविकांनाही घेण्यात येणार आहे. तसेच आरती दर्शन पासची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. १००-१०० जणांना मंगला आरती आणि शयन आरतीसाठी पास दिले जात आहेत. सदर पास ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही प्रकारात उपलब्ध असणार आहेत.
रामललाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास शास्त्री यांनी सांगितले की, सर्व वैष्णव मंदिरांमध्ये रामाचा दरबार आहे, ज्यामध्ये लक्ष्मण प्रभू श्रीरामासोबत आहेत. हनुमान आणि माता सीताही सोबत आहेत. काही ठिकाणी सीता माता आणि प्रभू श्रीरामांसह सर्व भावंडे असतात, तर काही ठिकाणी केवळ श्रीराम आणि सीता माता असतात. सीता माता सोबत असल्यामुळे काही मर्यादा येतात. संपूर्ण आरास होईपर्यंत पडदा हटवता येत नाही. परंतु, राम मंदिरात रामलला पाच वर्षांच्या बालकाच्या रूपात विराजमान आहे, येथे सीता माता नाही. त्यामुळे आरास करण्यासंदर्भातील बंधन नाही. या कारणाने राम मंदिर ट्रस्टने मंगला आरतीच्या दर्शनाची व्यवस्था केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, रामलला प्रभूंना विश्रांती मिळत नसल्यामुळे दर्शनाची वेळ बदलण्याचा विचार मंदिर ट्रस्टकडून केला जात होता. रामलला दर्शन काळात बदल लागू होऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, दर्शनाचा कालावधी सकाळी ७ ते दुपारी १२.३० आणि पुन्हा दुपारी १.३० ते रात्री १० असा निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत दुपारी १२.३० ते १.३० पर्यंत दर्शन बंद राहू शकते. या काळात रामलला विश्रांती घेतील, असा दावा केला जात आहे. याबाबत अद्याप स्पष्टता नाही