अकोला दिव्य न्युज ब्युरो : अयोध्यातील नवनिर्मित मंदिरात श्रीराम यांच्या बालस्वरुप मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानिमित्त ‘रामायण’ मधील प्रमुख घटना गुंफून सजीव पात्रांनी सादर केलेल्या ‘प्रिंस ऑफ अयोध्या’ या नाटिकेने उपस्थित पाहुणे आणि पालकांची मने जिंकली.नाटिकेतील बाल विद्यार्थ्यांच्या संवादफेक, अभिनय व सादरीकरणाची सर्वांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.
उदयोन्मुख एज्युकेशनल सोसायटी द्वारे संचालित जठारपेठ येथील हॅप्पी अॅवर्स शाळेतील विद्यार्थ्यांनी रामायणातील प्रसंगावरून प्रस्तुत केलेल्या नाटिकेचे उद्घाटन अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून हिन्दी साहित्यिक आणि समाजशास्त्र विषयाचे आचार्य डॉ.प्रमाद शुक्ला, मराठी न्यूज वेबसाइट ‘अकोला दिव्य’चे एडिटर इन चीफ गजानन सोमाणी आणि पालक वर्गाचे प्रतिनिधि व सराफा व्यापारी पुरुषोत्तम पसारी विराजमान होते.
सर्व प्रथम पाहुण्यांच्या हस्ते गणेश आणि सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजा अर्चना करण्यात आले. यानंतर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. संगीत शिक्षक व त्यांच्या संचाने शारदा स्तवन आणि राम भजन प्रस्तुत करुन कार्यक्रमाला सुरुवात केली.
शाळेच्या प्रांगणातील मंचावर उभारण्यात आलेल्या विलोभनीय रामदरबाराच्या माध्यमातून राजा दशरथ यांच्या चार पुत्रांचा जन्म सोहळा साकारण्यात आला.तेव्हा उपस्थित पालकगण उत्सव साजरा करीत असल्याचे दृश्य साकारण्यात आले. बाल्यावस्थेतील राम, लक्ष्मण, भरत, शत्रुध्न हे महर्षि वशिष्टांसोबत आश्रमात राहून सर्व विद्यांमध्ये प्रवीण झाल्याचा आणि अहिल्या उद्धार हे प्रसंग उत्तमरीत्या सादर केले. यानंतर मिथिला मध्ये शिवधनुष पेलून राम-सीता विवाह आणि अयोध्यात विराट स्वागत व राज्याभिषेकाची तयारी होत असताना मंथराने फूस लावल्याने कैकयीने राजा दशरथांकडून रामाला चौदा वर्षांचा वनवास इत्यादी प्रसंगांच्या देखाव्यांनी व्यक्तीच्या जीवनातील चढ-उतारांचे वर्णन विद्यार्थ्यांनी एवढे भावनात्मक केले की, पालक भावविभोर होऊन टाळ्यांचा गजर करीत होते. राम, लक्ष्मण व सीता यांचे चित्रकूट येथील वास्तव्य, सूर्पणखाचे नाक कापून आणि रावणाकडून आपल्या बहिणीच्या अपमानाचा सूड इत्यादी सोबत सर्व प्रसंग आणि शेवटी घनघोर युद्ध व अयोध्येत आगमन आदींचे प्रभावीरीत्या सादरीकरण करण्यात आले.
‘रामायण’ महाकथेतून आदर्श पिता- पुत्रांचे आचरण, आज्ञाधारक, मातृप्रेम, सर्वांबद्दल कर्तव्यनिष्ठा, धैर्य, शौर्य, मैत्री इत्यादींचे दर्शन घडविले. गीत रामायणातील सर्व प्रसंगांची निवड देवयानी वैद्य आणि अश्विनी धुसरकार यांनी करुन सुधीर फडके यांच्या गीत रामायणला पुर्ण आत्मीयतेने साकार केले. शिक्षिका देवयानी यांनी आपल्या मधुर व स्पष्टवाणीने सर्व प्रसंगांमध्ये जीव ओतला.तसेच शिक्षिका अश्विनी यांनी विद्यार्थ्यांची योग्य निवड करुन त्यांना अभिनय व संवाद यासाठी योग्य मार्गदर्शन करीत तालीम घेतली.
शिक्षक डाहाके यांनी संपूर्ण शाळेला कलात्मकतेने सुशोभित केले. पालकांचा सहभागी होऊन व विद्यार्थ्यांनी समर्पित असं योगदान दिले. संगीत शिक्षक चैतन्य खेडकर यांनी अतिदक्षतेने संगीत संचालन केले. उदयोन्मुख एज्युकेशनल सोसायटीच्या अध्यक्षा ज्योती, प्रदीप संगर, शाळेचे मुख्याध्यापक संतोष गजभिये आणि अभिलाष वाजपेयी यांनी आभार व्यक्त केले.शिक्षिका शिल्पा शाम नेने यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अत्यंत भक्तिमय वातावरणात कार्यक्रम पार पडला.