अकोला दिव्य न्युज ब्युरो : काँग्रेसचे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्ष व आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसला धक्का बसल्याचं बोललं जात आहे. एकीकडे अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशावर शिक्कामोर्तब होत असताना दुसरीकडे भाजपाची अशोक चव्हाणांबाबत पूर्वी काय भूमिका होती? याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून सोमवारी छत्रपती संभाजीनगरमधील जनसंवाद सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीसांनी अशोक चव्हाणांवर केलेल्या टीकेची ऑडिओ क्लिप ऐकवण्यात आली. आता देवेंद्र फडणवीसांचं एक जुनं ट्वीट व्हायरल होत असून त्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खोचक प्रश्न उपस्थित केला आहे.
अशोक चव्हाण यांनी सोमवारी दुपारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आता अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशावर शिक्कामोर्तब होत असताना देवेंद्र फडणवीसांनी २०१४ साली त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडीओची चर्चा पाहायला मिळत आहे.
काय आहे फडणवीसांची पोस्ट?
देवेंद्र फडणवीसांनी १४ ऑक्टोबर २०१४ रोजी, अर्थात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागण्यापूर्वी महाराष्ट्रातील आदर्श घोटाळा व सिंचन घोटाळ्यासंदर्भात ही पोस्ट केली होती. त्यात “मतदारांनो, तुमचं मत देण्यापूर्वी आदर्श घोटाळ्याचं वास्तव या व्हिडीओमध्ये बघा”, असं फडणवीसांनी लिहिलं होतं. या व्हिडीओमध्ये सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा, तत्कालीन महाराष्ट्र सरकार, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, अशोक चव्हाण, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्ताधारी पक्ष यांच्यावर परखड भाष्य करण्यात आलं आहे.“हे महाघोटाळे केले कुणी? हजारो कोटी कुणाच्या खिशात गेले? आपल्या मंत्र्यांवर कारवाई का केली नाही? जबाब द्या, हे हजारो कोटी कुठे गेले?” असे प्रश्न या व्हिडीओमधून उपस्थित करण्यात आले आहेत. शिवाय, “मतदारराजा, तूच सांग.. या काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादीचं काय करायचं?” असा प्रश्नही व्हिडीओमध्ये विचारण्यात आला आहे.
अंजली दमानिया यांची खोचक पोस्ट!
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांचं हे ट्वीट रीपोस्ट करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यावर खोचक पोस्ट लिहिली आहे. “(या सगळ्या परिस्थितीवर) एक वाक्य म्हणावंसं वाटतंय. कोण होतास तू, काय झालास तू?” असं या पोस्टमध्ये अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.