अकोला दिव्य न्युज ब्युरो : देशातील नागरी सहकारी बँका आणि पतसंस्था यांची राष्ट्रीय पातळीवर कार्यरत नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक्स अॅण्ड क्रेडिट सोसायटीज लिमिटेडची नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी काल सोमवार १२ फेब्रुवारीला झालेल्या निवडणुकीत विदर्भातील ख्यातनाम अकोला जनता बॅंकेचे अध्यक्ष ज्ञानचंद लछमदासजी गर्ग विक्रमी मताधिक्यांनी विजयी झाले. त्यांच्या विजयाने अकोला जिल्ह्यासह विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. विशेष म्हणजे संचालकपदाच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व संचालकामध्ये गर्ग यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत.
नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज लिमिटेड (NAFCUB) ही देशातील नागरी सहकारी बँका आणि क्रेडिट सोसायटी लि.ची सर्वोच्च स्तरावरील प्रमोशनल संस्था आहे. शहरी सहकारी पत चळवळीला चालना देणे आणि क्षेत्राच्या हिताचे रक्षण करणे या मुख्य उद्दिष्टांसाठी 17 फेब्रुवारी 1977 रोजी बहु-राज्य सहकारी संस्था कायद्यांतर्गत फेडरेशनची नोंदणी बहु-राज्य सहकारी संस्था म्हणून करण्यात आली. NAFCUB चे नोंदणीकृत कार्यालय दिल्ली येथे असून कार्यक्षेत्र संपूर्ण देशात आहे. संपूर्ण भारतात कार्यरत असलेल्या सुमारे 1600 नागरी सहकारी बँका आणि 50 हजाराहून अधिक सहकारी पतसंस्थांचे प्रतिनिधित्व करते. अशा या ‘नॅफकब’ संस्थेच्या नवीन पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य निवडीसाठी जाहीर करण्यात आलेल्या निवडणुकीसाठी पात्र उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर एकूण ३७ उमेदवार रिंगणात होते. तर 328 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
ही लढत प्रामुख्याने नॅफकबचे निवर्तमान अध्यक्ष व गुजरातमधील ‘अनुभवी सहकारी बॅंकेचे ज्योतिंद्रभाई मेहता यांच्या नेतृत्वाखालील पॅनल आणि भारतातील दुसरी सर्वात मोठी सहकारी बँक असलेल्या कॉसमॉस बँकेचे समूह अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर यांच्या नेतृत्वातील पॅनेलमध्ये झाली. तसेच अनेक उमेदवारांनी अपक्ष म्हणून लढत दिली. नवी दिल्ली येथे येथे 3 फेब्रुवारी 2019 रोजी मतदान झाले. निवडणुकीचा निकाल अनपेक्षित राहणार, असे विश्लेषकांचे म्हणणे होते आणि त्या प्रमाणेच आज 13 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालात कॉसमॉस बँकेचे समूह अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर यांच्या नेतृत्वातील पॅनेल विजयी झाले. तथापि, राज्य महासंघ आणि संघटनांचे नऊ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. महाराष्ट्र राज्यातून दोन संचालक निवडण्यासाठी तब्बल 11 सहकारी बॅंकेचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. अकोला जनता को-ऑपरेटिव मल्टीस्टेट शेड्यूल बॅंकेचे अध्यक्ष ज्ञानचंद लछमणदास गर्ग यांनी सर्वाधिक मतदान घेऊन दणदणीत विजय प्राप्त केला. त्यांच्या विजयी होण्याचे वृत्त कळताच विदर्भातील बॅंकींग क्षेत्रात आणि अकोला शहरात जल्लोष साजरा करण्यात आला.
देशभरात मजबूत, व्यवहार्य नागरी सहकारी बँकिंग व पतप्रणाली तयार करण्यासाठी, संस्थांसाठी समान विकासासाठी आणि क्षेत्राचा प्रभावी आवाज बनण्यासाठी, दृश्यमान कमकुवतपणा आणि दुर्बलता दूर करण्यासाठी आपण वचनबद्ध राहून कार्य करणार, असे ज्ञानचंद गर्ग यांनी अकोला दिव्य सोबत बोलताना सांगितले. शिक्षण आणि इतर सहाय्य प्रदान करणे आणि सहकारी व्यवस्थेतील सामर्थ्याचा फायदा घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व संस्थांना एकसंघ होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.