Saturday, December 21, 2024
Homeताज्या बातम्यातरीही आता महाराष्ट्रात भाजप व गद्दार प्रवृत्तीच्या नेत्यांना थारा नाही - अँड....

तरीही आता महाराष्ट्रात भाजप व गद्दार प्रवृत्तीच्या नेत्यांना थारा नाही – अँड. यशोमती ठाकूर

अकोला दिव्य न्युज ब्युरो : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्य व आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व माजी मंत्री अँड. यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, चव्हाण यांच्यासारख्या नेत्याला ब्लॅकमेलिंग करून भाजपने फोडले आहे, मात्र भाजपाने कितीही प्रयत्न केले, दबाव टाकून नेत्यांना ओढण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातील जनता मात्र भाजप आणि अशा गद्दार प्रवृत्तीच्या नेत्यांना निश्चितच थारा देणार नाही.

केंद्र सरकारने नुकताच प्रसिद्ध केलेल्या श्वेतपत्रिकेमध्ये काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचे नाव आल्यानंतर त्यांनी दिलेला हा राजीनामा कशाचे लक्षण आहे हे स्पष्ट होते. अशोक चव्हाण यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने दबाव होताच, मात्र अखेरीस त्यांना अशा पद्धतीने ब्लॅकमेल करून राजीनामा द्यायला भाग पाडले आहे. स्वतःच्या पक्षाची ताकद व प्रतिमा दोन्ही उतरणीला लागल्यामुळे भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीचे डाव खेळत आहे.

काही समस्यांमध्ये / प्रकरणांमध्ये अडकलेल्या काही आदर्श नेत्यांना भाजप आपल्याकडे दबाव टाकून ईडी, सीबीआय या यंत्रणांची भीती दाखवून पक्षात घेऊ शकते. मात्र तमाम जनता जनार्दनाला ही बाब निश्चितच रुचणारी नाही. अत्यंत विकृत पद्धतीच्या या राजकारणाचा शेवट येत्या निवडणुकीत सुज्ञ मतदारांकडून निश्चितच केला जाईल याची आम्हाला खात्री आहे. यापूर्वीही मुघल सेना प्रचंड फौज फाटा आणि दारूगोळा घेऊन इथल्या मावळ्यांवर चाल करून आली होती. आमिष दाखवून आणि भीती दाखवून इथल्या काही मनसबदाराना आणि वतनदारांना मुघलांनी आपल्या बाजूने करून घेतले होते. देशासाठी, स्वराज्यासाठी लढणाऱ्या,मातीशी इमान बाळगलेल्या, संख्येने कमी असलेल्या मावळ्यांचा छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वाखाली विजय झाला हे महाराष्ट्र विसरलेला नाही. आगामी निवडणुकीत हे विसरणारही नाही. विकृत राजकारणाला आणि गद्दार युतींना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही असेही अँड. ठाकूर म्हणाल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!