अकोला दिव्य न्युज ब्युरो : जन्मतः रक्ताच्या संबंधित आजार जसे थॅलेसिमीया, हिमोफेलिया व सिकलसेल इत्यादी रुग्णांच्या विविध अडीअडचणींवर तोडगा काढण्याकरीता दिव्यांग मंत्रालय मुंबई येथे मंगळवार 13 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजता हरीश आलिमचंदाणी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आलिमचंदाणी यांना या बैठकीचे अध्यक्षपद विभुषित करण्याची जबाबदारी आ बच्चुभाऊ कडु यांनी देऊन तसे लेखी पत्र पाठविले आहे. या बैठकीत आरोग्य आयुक्त, आयुक्त वैद्यकीय शिक्षण, सहाय्यक संचालक रक्त संक्रमण मुंबई, मुख्य वैद्यकीय अधिकारी बीएमसी, विशेष कार्याधिकारी मुख्यमंत्री सहायता कक्षाचे विशेष कार्याधिकारी तसेच थालेसिमिया असोसिएशन, सिकलसेल हितचिंतक कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहेत.
दिव्यांगजणा करीता झटणारा, त्यांचा हक्काचा माणूस म्हणून आ.कडु ख्यातनाम आहेत. या दरम्यान अकोला थॅलेसिमीया सोसायटीच्या कार्यक्रमात आ.कडु यांना रक्ता संबधीत जन्मतः असलेल्या आजाराची माहीती देवून यावर सरकारने काम करण्याची अतिशय गरज असल्याचे हरीशभाई यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यावेळीच भक्कम आर्थिक मदत देऊन आ. बच्चुभाऊ यांनी सरकार दरबारी दखल घेवू असे वचन दिले होते. या नंतर सतत संपर्कात राहून या विषयावर तोडगा काढण्याकरीता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
अनेक वर्षांपासून हरीषभाई आलीमचंदानी हे थॅलैसिमीया सोसायटी द्वारे थॅलैसिमीया रुग्णांची सेवा करीत आहेत. बोनमॅरो ट्रासप्लांट करीता रुग्णांना आर्थिक मदत, तसेच अकोला येथील नविन बस स्थानका जवळ “डे केअर सेंटर” सुरु केले आहे जेथे रुग्णांना मोफत रक्त दिले जाते. एक तज्ञ डॉक्टर, नर्स, अनुभवी सेवक असा ताफा सेवेकरीता तयार असतो. वेळोवेळी थॅलेसिमीया रुग्णांची तपासणी व रक्तदान शिबीर अखंडपणे सुरू आहे. यामुळे हरीश आलीमचंदानी यांना सर्व स्तरावरच्या कार्याचा अनुभव असल्याने, अडचणी जाणून घेतल्यानंतर त्यावर तोडगा काढण्यासाठी उपस्थित राहावे आणि मार्गदर्शन करावे, या करीता अध्यक्ष म्हणून आमंत्रित केले आहे.
थॅलेसिमीया रुग्णांसाठी हरीशभाई यांनी केलेल्या कार्याची दखल घेतल्या बद्दल श्री.हरीशभाई मित्र मंडळ, श्री.आळशी प्लॉट मित्र मंडळ व श्री. निरंजन योगसाधना वर्गातर्फे आ.बच्चुभाऊ कडु यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे. समाजाच्या सर्वस्तरावरून हरीश आलीमचंदानी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.