अकोला दिव्य न्युज ब्युरो : हिललाइन पोलिस ठाण्यातच आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणात फरार आरोपी आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव (२५), त्यांचा समर्थक नागेश बडेराव (३०) यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. हे दोघे भारताबाहेर पळून गेल्याची माहिती निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध लूक आउट नोटीस जारी केली जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागातील ६ वेगवेगळ्या पथकांमार्फत (एसआयटी) गाेळीबार प्रकरणाचा तपास सुरू आहे. आ. गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे महेश गायकवाड यांच्यात १० ते १२ वर्षांपासून पूर्ववैमनस्य आहे. अंबरनाथमधील द्वारली गावातील जमिनीच्या वादाचे हे कारण तत्कालीन असले तरी ते अनेक वेळा वेगवेगळ्या कारणांमुळे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. ज्या कंपनीकडे या वादग्रस्त जमिनीचा ताबा आहे, त्या कंपनीमध्ये आ. गायकवाड यांचे पुत्र वैभव हे भागीदार आहेत.
जमिनीचा ७-१२ कंपनीच्या नावे आहे. त्यामुळे जमिनीचा आपल्याकडे रीतसर ताबा असून, महेश हे जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आ. गायकवाड यांनी तपास पथकाकडे केला. याउलट, संबंधित जमीन महारवतनी असूनही शेतकऱ्यांना योग्य मोबदला न देता फसवणुकीने जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप महेश यांनी केल्याचे तपासात निदर्शनास आले.