शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदार सुरतला गेले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माझा गेम करण्याचा आदेश दिला होता, असा खळबळजनक आरोप उबाठा शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी आज येथे केला.
अकोल्यात पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी हा दावा केला. २० जून २०२२ ला एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड करून आमदारांसह सुरत गाठले होते. त्या आमदारांमध्ये बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचा समावेश होता. मात्र, सुरतमध्ये नितीन देशमुख यांची प्रकृती अचानक बिघडल्याच्या बातम्या पुढे आल्या होत्या. त्यानंतर देशमुखांनी शिंदेंची साथ सोडून ते उद्धव ठाकरेंकडे परतले.
शिंदे गटातील एका जवळच्या मित्र आमदाराने दिलेल्या माहितीनुसार आ.देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केला. मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक घोसाळकर यांच्या हत्येनंतर देशमुख यांनी आपला ‘गेम’ करण्याचे नियोजन होते, असा दावा केला. ते म्हणाले, सध्या सत्तेसाठी हे कुठल्याही थराला जाऊ शकतात. कोणाची हत्या करण्याचे काम पडले तरी ते करू शकतात. कुटुंबात दुफळी निर्माण केली जाते.
मला शिंदे गटातील जवळच्या एका आमदाराने माहिती दिली. त्यांनी सांगितले की ज्यावेळी तुम्ही बंडादरम्यान सुरतला होते, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी गेम करण्याचे आदेश सुद्धा दिले होते. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी मला हृदयविकाराचा झटका आल्याची खोटी बातमी प्रसारमाध्यमांना दिली, असा दावा नितीन देशमुख यांनी केला आहे.