अकोला दिव्य न्युज ब्युरो : लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले असताना देशातील विविध संस्थांच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज बांधणारे सर्व्हे समोर येत आहेत. काल टाइम्स नाऊचा सर्व्हे समोर आला होता. आज ‘इंडिया टुडे मूड ऑफ नेशन’चा सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेतून इंडिया आघाडीच्या पारड्यात महायुतीपेक्षा अधिक जागा दाखविल्या आहेत. महाराष्ट्रातील ४८ पैकी २६ जागांवर इंडिया आघाडी मुसंडी मारेल, असे सांगण्यात आले आहे. याबद्दल इतर सर्व्हे काय सांगतात, त्याची आकडेवारी पाहू.
इंडिया टुडेचा ‘द मूड ऑफ द नेशन्स फेब्रुवारी २०२४’ हा सर्व्हे सर्व लोकसभेतील ३५,८०१ प्रतिसादकर्त्यांच्या आधारावर बेतलेला आहे. १५ डिसेंबर २०२३ ते २८ जानेवारी २०२४ या काळात हे सर्वेक्षण केले गेले. इंडिया आघाडीला २६ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करत असताना भाजपा आणि एनडीए आघाडीला २२ जागा मिळू शकतील, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे.
इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या कामगिरीवर नजर टाकली असताना काँग्रेस पक्षाला चांगला पाठिंबा मिळत असल्याचा दावा सर्व्हेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला १२ जागा मिळतील, असे दाखविण्यात आले आहे. विशेष म्हणजे मागच्या दोन निवडणुकात काँग्रेसची कामगिरी निराशाजनक राहिलेली आहे. २०१४ साली काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले होते. तर २०१९ साली बाळू धानोरकर यांच्या रुपाने केवळ एक जागा काँग्रेसला मिळाली होती.
शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांना एकत्रित १४ जागा मिळतील असे सर्व्हेच्या माध्यमातून सांगण्यात आले. मतदानाच्या टक्केवारीवर नजर टाकली असता इंडिया आघाडीला ४५ टक्के तर एनडीएला ४० टक्के मतदान मिळेल असे भाकीत वर्तविले आहे.दुसरीकडे टाइम्स नाऊ मॅट्रीज या वृत्तसंस्थेचाही सर्व्हे समोर आला आहे. ज्यामध्ये एनडीएला ३९ तर इंडिया आघाडीला केवळ ९ जागा मिळतील, असा अंदाज मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान मॅट्रीजच्या सर्व्हेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, सर्व्हे काहीही आले तरी लोकांची मानसिकता मोदींना पाठिंबा देण्याची बनली आहे. लोकांनी ठरवलं आहे की, मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचं. त्यामुळे मोदीजी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाला जनता निवडून देईल. गतवेळेपेक्षा आमच्या अधिक जागा निवडून येतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ पेक्षा अधिक मतदान घेण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघात किमान १० टक्के मतदान वाढण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. लोकसभेत बोलत असताना पंतप्रधान मोदींनी जाहीर केले की, भाजपा ५१ टक्के मतदान घेऊन ३७० जागा मिळवेल तर एनडीए आघाडी एकत्रितपणे ४०० हून अधिक जागा घेईल.