अकोला दिव्य न्युज ब्युरो : पोलीस ठाण्यातच दोन नेत्यांमध्ये जोरदार राडा होऊन भाजप आमदाराने शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुखावर गोळीबार केल्याने राज्यात खळबळ उडाली. या घटनेत जखमी झालेल्या शिवसेना नेत्याला अगोदर उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर ठाणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पोलिसांनी भाजप आमदाराला ताब्यात घेतले आहे. पोलीस निरिक्षकांच्या केबीनमध्ये या दोन नेत्यांमध्ये वाद सुरू झाला. यावेळी हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेली माहिती अशी, उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जगताप यांच्या कॅबिन मध्ये शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्याचे साथीदार राहुल पाटील व भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या मध्ये एका विषयावरून सुरवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर शिवीगाळ व गोळीबार झाला. यामध्ये महेश गायकवाड यांना ४ तर राहुल पाटील यांना २ गोळ्या लागल्या आहेत. याप्रकाराने खळबळ उडून दोन्ही गटाच्या समर्थकांनी एकच गोंधळ पोलीस ठाणे व परिसरात घातला.
हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांच्या केबिन मध्ये रात्री अंदाजे ११ वाजता गोळीबार झाला असून यापूर्वीही महेश गायकवाड व आमदार गणपत गायकवाड यांच्या हाणामारी झाल्याचे प्रकार झाले. असे पोलिसांचे म्हणणे आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी स्वतःनी गोळीबार केल्याचा कबूली दिली असल्याचे वृत्त आहे.