अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला येथील ज्युबिली इंग्लिश हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात व आनंदाच्या वातावरणात पार पडले. शाळेत माजी विद्यार्थी संघटना नोंदणीकृत करण्यात आली असून, सर्व माजी विद्यार्थ्यांना त्यात जोडण्यात आले आहे. कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर लहानपणी शाळेच्या बाहेर मिळणारा नाष्टा जसे पोगा पंडित, गूळ पट्टी, चिवडा, चना-मठ मिसळ, बोर, कवीट इत्यादी पदार्थांचा अल्पोपहार करण्यात आला.
ज्युबिली इंग्लिश हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ.राजेश अग्रवाल यांनी सर्वांचे स्वागत करून आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळा व विद्यार्थ्यांच्या हितासाठी कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांनी भविष्यातील योजनेसाठी अनेक सूचना मागवल्या, त्यात अनेक विद्यार्थ्यांनी मोकळेपणाने सुंदर सूचना पाठवल्या आणि प्रत्येकाने त्या सूचना मान्य केल्या. सचिव सीए मनोज चांडक यांनी संस्थेची गरज व महत्त्व विशद करून कार्यक्रमचे शानदार संचलन केले. त्यांनी संजय भाकरे, नरेंद्र अग्रवाल, अनिल अग्रवाल, मधुर खंडेलवाल, अमित कोलटकर, शैलेंद्र अग्रवाल आणि अँड रणछोड राठी यांचा समावेश असलेल्या कार्यकारी मंडळ सदस्यांची ओळख करून दिली.
त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला, जुन्या गोष्टी सांगितल्या आणि एकमेकांसोबत मौजमजा केली, मनोज चांडक आणि गिरीश शर्मा यानी सुरेख गाणी गायली. विविध खेळ व संगीताचा आनंद लुटला. शैलेंद्र अग्रवाल यांनी मनोरंजक खेळ खेळून वातावरण उत्साह भरला. कृतज्ञतेची गोड अभिव्यक्ती मधुर खंडेलवाल यांनी केली. शेवटी शाळेच्या दिवसांप्रमाणे या मित्रांचा गप्पांचा फड रंगला जेवणाचा आस्वाद घेत लवकरच पुन्हा भेटू असे आश्वासन एकमेकांना देऊन कार्यक्रमाची सांगता केली.