अकोला दिव्य न्युज ब्युरो : बिहारमध्ये आजचा दिवस हा नाट्यमय राजकीय घडामोडींचा असणार आहे. त्याची सुरूवात सकाळी नितीश कुमार यांच्या राजीनाम्याने झाली आहे. नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांची आरजेडी आणि जेडीयू यांच्या महागठबंधन सरकारमधील आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राजभवनात जाऊन राज्यपालांकडे सोपवला आहे. तसेच, भाजपासोबत नव्याने सरकार स्थापनेचा दावा देखील केला आहे. जेडीयूच्या बैठकीनंतर या घडामोडी घडल्या. भाजपाकडून समर्थनाचे पत्र देखील नितीश कुमारांना मिळाले असल्याने सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास शपथविधी पार पडू शकतो अशी शक्यता आहे. तसे झाल्यास आज नितीश कुमार तब्बल नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (युनायटेड) चे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांनी पाटणा येथील राजभवनात येऊन रविवारी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. राजभवनात राज्यपालांना भेटून नितीश यांनी त्यांना सांगितले की, आम्ही राज्यातील महागठबंधनशी म्हणजे लालू यादव राष्ट्रीय जनता दलाशी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ‘महागठबंधन’ राजवट संपवून नितीश कुमार हे भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) पुन्हा सामील होणार असल्याचेही जवळपास निश्चित आहे.
माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे राज्यातील वेगाने बदलणाऱ्या राजकीय घडामोडींना सुरुवात झाली होती. त्यात जेडी(यू) वर टीका करताना त्या म्हणाल्या होत्या की, समाजवादी पक्ष स्वतः पुरोगामी आहे, त्याची विचारधारा बदलत्या वाऱ्याच्या नमुन्यांनुसार बदलत आहेत ही चांगली बाब नाही.
बिहार विधानसभेचे पक्षीय बलाबल
२४३ जागांपैकी लालू यादवांच्या आरजेडीचे ७९, भाजपाचे ७८ आणि नितीश कुमारांच्या जेडी(यू)चे ४५ आमदार आहेत.
तर काँग्रेस १९, CPI (M-L)चे १२, CPI(M) आणि CPI यांचे प्रत्येकी २ आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चा (सेक्युलर) चे ४ आमदार आहेत. याशिवाय आणखी दोन जागांपैकी एकावर एमआयएम आणि एक जागी अपक्ष आमदार आहे.