अकोला दिव्य न्युज ब्युरो : स्व. प्रभाताई नारे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित मातृसप्ताहांतर्गत घेण्यात आलेल्या विविध आंतरशालेय स्पर्धांचा पुरस्कार वितरण सोहळा प्रभात किड्स स्कूल येथे गुरुवार दि. 25 जानेवारी रोजी संपन्न झाला. या स्पर्धांमध्ये सर्वाधिक सहभाग व पारितोषिके मिळविणार्या कोठारी कॉन्व्हेंटला चॅम्पियनस् ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विविध स्पर्धांमधील विजयी स्पर्धंकाना बक्षीसे देऊन सत्कार करण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला अध्यक्ष म्हणून प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे लाभले होते तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मधु जाधव, शिक्षण तज्ज्ञ सौ. भारती दाभाडे, संचालक मंडळ सदस्य अशोक ढेरे, संचालिका सौ. वंदना नारे, प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, व्यवस्थापक अभिजीत जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.
नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत संभाषण कौशल्य अत्यंत आवश्यक असून यावर भर देण्याचा प्रयत्न या विविध आंतरशालेय स्पर्धांच्या माध्यमातून केल्याचे प्रतिपादन डॉ. गजानन नारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. त्यांनी विजेत्यांसह सर्व सहभागी स्पर्धकांचेदेखील अभिनंदन केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभातच्या प्राचार्य वृषाली वाघमारे यांनी केले.
विद्यार्थ्यांमधील कलागुणांना व्यासपीठ मिळावं व तसेच त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून मातृसप्ताहांतर्गत 19 ते 25 जानेवारीदरम्यान चार आंतरशालेय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. आंतरशालेय तबला हार्मोनियम जुगलबंदी स्पर्धा, साइंटीफीक रांगोळी स्पर्धा, स्मार्ट एंट्राप्रनोर स्पर्धा आणि समूह लोकनृत्य स्पर्धेत विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध स्पर्धांमधील विजयी विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले तर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख अतिथींच्या हस्ते स्व. प्रभाताई नारे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन झीनल सेठ यांनी केले तर आभार उपप्राचार्य अर्चना बेलसरे यांनी मानले. प्रभातचे सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे यांच्या संयोजनात शिक्षकांसह संगीत विभाग, कला विभाग, ग्राफिक विभाग, तांत्रिक सहाय्य विभागाच्या कर्मचार्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
तबला हामोर्नियम जुगलबंदी स्पर्धेत नोवेल स्कूलची चमू प्रथम
आंतरशालेय तबला हामोर्नियम जुगलबंदी स्पर्धेत नोवेल स्कूलचे ओम कोरडे व तन्मय कोरडे यांना प्रथम, समर्थ पब्लिक स्कूलचे रेवा जोगळकर व हिमांशु पिंजरकर द्वितीय, कोठारी कॉन्व्हेंटचे स्वरा देशपांडे व एकलव्य देशमुख हे तृतीय आले. तर बालशिवाजी स्कूलच्या पियुष भांडे, सोहम देशपांडे व राजेश्वर स्कूलच्या शंतनु जोशी व मोहीत वाठूरकर यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले.
समूह लोकनृत्य स्पर्धेत स्कूल ऑफ स्कॉलर्स प्रथम
समूह लोकनृत्य स्पर्धेत स्कूल ऑफ स्कॉलर्स प्रथम व ज्युबिली इंग्लिश स्कूल द्वितीय तर आरडीजी पब्लिक स्कूलला तृतीय तसेच खंडेलवाल इंग्लिश स्कूल व विवेकानंद इंग्लिश हायस्कूलला प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करण्यात आले.
स्मार्ट एंट्राप्रनोर स्पर्धेत आरडीजी प्रथम
स्मार्ट एंट्राप्रनोर स्पर्धेत आरडीजी पब्लिक स्कूलचे स्वयंम धवाले, मन सपारीया, वेद तिवारी प्रथम व स्कूल ऑफ स्कॉलर्सचे स्वराज सुळकर, शाहील भुतडा, अथर्व पडखे, सोहम अवतीरक यांना द्वितीय तर कोठारी कॉन्व्हेंटचे आयुष मनवानी, सिद्धी सेठीया, सुर्यवंश तिवारी, कनक अग्रवाल तृतीय राजेश्वर कॉन्व्हेंटच्या श्रेयश इंगळेला ज्युरी अवॉर्ड प्रदान करण्यात आला.
साइंटिफीक रांगोळी स्पर्धेत नोवेल प्रथम
साइंटिफीक रांगोळी स्पर्धेत नोवेल स्कूलचे दर्शना नंदापुरे, श्रद्धा मुळे, गौरी देशमुख प्रथम व खंडेलवाल इंग्लिश हायस्कूलचे ईश्वरी वर्हाडे, आस्था साबळे, अनुष्का गावंडे द्वितीय तर बालशिवाजी हायस्कूलचे आस्था ढाये, गिरीजा दळवी, समृद्धी माकळकर तृतीय तसेच खंडेलवाल ज्ञानमंदीरचे रिद्धी अंबुसकर, तृप्ती बढे व पुनम डहाने यांना प्रोत्सहनपर पुरस्कार प्रदान करण्यात आले.