Tuesday, January 14, 2025
Homeअर्थविषयकमोदींना जबर धक्का ! सूरत डायमंड बोर्समध्ये शुकशुकाट : महिन्याभरातच घरघर लागली

मोदींना जबर धक्का ! सूरत डायमंड बोर्समध्ये शुकशुकाट : महिन्याभरातच घरघर लागली

अकोला दिव्य न्युज ब्युरो : मुंबईचे महत्व कमी करत सुरतला हिऱ्यांचा व्यापार हलविण्याच्या गुजरातच्या प्रयत्नांना सुरुंग लागला आहे. सूरत डायमंड बोर्सच्या इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर तिथेच सर्व हिरे व्यापाऱ्यांची कार्यालये हलविण्यात आली होती. यामध्ये सर्वात मोठी कंपनी किरण जेम्सदेखील होती. परंतु या कंपनीचा मोहभंग झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या कंपनीने आपला कारभार पुन्हा मुंबईला हलविण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 17 डिसेंबरला सूरत डायमंड बोर्स या भल्या मोठ्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते. या बोर्सच्या उभारणीमागे किरण जेम्सच्या वल्लभभाई लखानी यांचा मोठा हात होता. त्यांनी सुरतला शिफ्ट होताना मुंबईतील सर्व कार्यालये बंद करणार असल्याची घोषणा केली होती. परंतु एक महिन्यातच त्यांना उपरती झाली आहे. 

आम्ही मीटिंगमध्ये वल्लभ भाईंना त्यांचा व्यवसाय मुंबईला हलवण्यास सांगितले आहे आणि डायमंड बोर्स सक्रियपणे चालू झाल्यावर परत या, असे सांगितल्याचे सुरत डायमंड बोर्सच्या समितीच्या एका मुख्य सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली आहे. तुम्ही एकट्याने शो सुरु ठेऊ शकत नाही. वल्लभभाई हे एकटे पडले होते, त्यांना कोणीच साथ दिली नाही, असे या सदस्याने म्हटले आहे. 

आपली कंपनी सुरतला हलविणारे वल्लभ लाखानी हे पहिले हिरे व्यापारी होते. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी तिथे १२०० फ्लॅट देखील बांधले. एसडीबीच्या मागचे डोकेही त्यांचेच होते, परंतु इतर व्यापाऱ्यांनी तिकडे पाठ फिरविली. त्यामुळे बोर्समध्ये शुकशुकाट पसरला आहे. 

यामागे मुख्यत्वे दोन कारणे आहेत. बोर्स हा दुर्गम भागात उभारण्यात आला आहे. जिथे कनेक्टिव्हिटी नाहीय. वाहतुकीची साधने नाहीत. यामुळे शिफ्टींग केले तर तोटा वाढेल याची व्यापारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये कुजबुज सुरु होती. मुंबईत स्थिरस्थावर असलेले कर्मचारी देखील सुरतला कुटुंबकबिला हलविण्यासाठी तयार नव्हते. तसेच सुरतचे कर्मचारी देखील शहरापासून बोर्स लांब असल्याने या प्रवासासाठी नाराज होते. 

मोदींना दुसरा धक्का…

महाराष्ट्रातील उद्योग पळविणाऱ्या मोदींना हा दुसरा धक्का आहे. यापूर्वी फॉक्सकॉनसोबतची वेदांताची कंपनी महाराष्ट्राकडून काढून घेऊन गुजरातला नेण्याचा कट रचला होता. ही कंपनी गुजरातला नेण्यात आली होती. परंतु काही महिन्यांतच फॉक्सकॉनने ही डील रद्द केल्याची घोषणा केली होती. यानंतर सर्वात मोठा हिरे व्यापार गुजरातला नेण्याचा घाट घालण्यात आला. त्यालाही आता महिन्याभरातच घरघर लागली आहे. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!