गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील दौरे राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाचे मानले जात आहेत. उत्तर प्रदेशनंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जातो आहे.आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून लोकसभेच्या ४५ जागा जिंकण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे.अशी माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीने ४१ जागांवर विजय मिळवला होता. मात्र, निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांची युती संपुष्टात आली. शिवाय आता भाजपाबरोबर शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपासाठी सोप्पी नक्कीच नसणार आहे. अशा परिस्थितीत विरोधकांवर पूर्णपणे वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जातो आहे.
पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्राचे दौरे हे केवळ मोठ्या प्रकल्पांच्या उद्धघाटनासाठी नव्हते. यावेळी त्यांनी अनेक छोट्या प्रकल्पांचेही उद्धाटन केले. फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांनी मुंबई-शिर्डी-सोलापूर या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्या दोन वंदे भारत एक्स्प्रेला हिरवा कंदील दाखवला होता. याशिवाय त्यांनी सांताक्रूझ-चेंबूर लिंकरोड आणि कुरार अंडरपासचे उद्घाटन केले होते. त्यानंतर ऑगस्ट २०२३ मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर पुण्यातील एका कार्यक्रमालाही उपस्थित होते. या दौऱ्यावेळी त्यांनी पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन केले. पुढे सप्टेंबरमध्ये पंतप्रधान मोदींनी अहमदनगर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी जवळपास पाच हजार कोटी रुपयांच्या सिंचन प्रकल्पाचे लोकार्पण केले. त्याच दिवशी त्यांनी शिर्डीतील साई मंदिराला भेट दिली. तसेच शिर्डीत रेल्वेस्थानकावर यात्रेकरूंसाठी बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक वातानुकूलित आराम कक्षाचेही उद्घाटन केले.
पंतप्रधान मोदींनी मागील काही दौऱ्यामध्ये नागपूर, पुणे, अहमदनगर, शिर्डी, नाशिक, सिंधुदुर्ग आणि सोलापूर यांसारख्या किमान १५ लोकसभा मतदारसंघातील प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे. यामध्ये मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांचाही समावेश आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या नवी मुंबई दौऱ्यानंतर ठाणे आणि रायगड मतदारसंघातही भाजपाची मजबूत स्थिती असेल, असा दावा भाजपाकडून करण्यात आला आहे.
जेव्हा एखाद्या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येते, तेव्हा त्याचा प्रभाव संपूर्ण राज्यात आणि संबंधित मतदारसंघावर पडतो. डिसेंबर २०२२ झालेल्या पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्याचा प्रभाव विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल, अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
पंतप्रधान मोदींच्या या सततच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. “भारताच्या पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित मोठ्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे, पण मोदींच्या भाजपाने एक नवा आदर्श घातला आहे. ते राजकारणाच्या पलीकडे विचारच करू शकत नाहीत. राज्यातील ज्या प्रकल्पांचे उद्घाटन मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री करणे अपेक्षित असते, त्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे”, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले. याशिवाय पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यांवरून काँग्रेसनेही भाजपावर टीकास्त्र सोडलं. “पंतप्रधानांना दर महिन्याला महाराष्ट्रात यावं लागत असेल, तर महाराष्ट्रात भाजप किती कमकुवत झाला आहे, हे दिसून येते. भाजपाला आता जनतेवर विश्वास राहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
दरम्यान, विरोधकांच्या टीकेला भाजपानेही प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्याकडे विकासाचा अजेंडा राबवणारे पंतप्रधान आहेत. जनतेची काळजी करणारा नेता मिळणं हे आपलं भाग्य आहे. शिवाय, पंतप्रधान आणि भाजपाने दिलेली सर्व आश्वासने विक्रमी वेळेत पूर्ण केली आहेत. एक पक्ष म्हणून आम्ही केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवणं आमचं कर्तव्य आहे, त्यात काहीही चुकीचं नाही, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.