अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीसोबत युती होणारच असून त्यासाठी अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत बोलणी करण्याची जबाबदारी शरद पवार व उध्दव ठाकरे यांना सोपविण्यात आली आहे. कॉंग्रेस पुढारी आणि कॉग्रेस पक्षाशी संलग्न सर्व फ्रंटचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मतभेद विसरून या निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीतील उमेदवाराला विजयी करण्यासाठी आतापासूनच कामाला लागा. लोकसभा निवडणूकीसाठी कॉंग्रेस सज्ज असल्याचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक आढावा बैठक काँग्रेस पक्षाच्या अमरावती कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी रमेश चेन्नीथला यांनी मार्गदर्शन करताना अनेक बाबींचा उहापोह केला.
अकोला जिल्ह्यातील शहर व ग्रामिण मधील सर्व तालुका, युवक, महिला काँग्रेस, एन.एस.यु.आय. सेवादल व अन्य सर्व आघाड्या व सेलची कार्यकारीणी, बुथप्रमुख व बुथकार्यकर्ते यांची यादी तपासण्यात आली. शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे यांनी या विषयी माहीती सादर केली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांना छत्रपती शिवरायांची प्रतिमा भेट देवून त्यांचे स्वागत केले. या बैठकीस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री यशोमतीताई ठाकुर, प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसिम खान, चंद्रकांत हांडोरे, अनिस अहमद, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, अ. भा. काँग्रेसचे सचिव आशिष दुआ, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे आदी उपस्थित होते.
अकोला जिल्ह्यातून यावेळी माजी मंत्री अजहर हुसेन, प्रदेश सरचिटणीस बबनराव चौधरी, डॉ. अभय पाटील, माजी आमदार अॅड. एस.एन. खतीब, माजी महापौर मदन भरगड, प्रदेश सचिव प्रकाश तायडे, प्रशांत गावंडे, माजी विरोधी पक्षनेते साजिदखान पठाण, डॉ. झिशान हुसेन, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निनाद मानकर, शहर अध्यक्ष आकाश कवडे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पुजा काळे, शहर अध्यक्ष पुष्पा देशमुख,प्रमोद डोंगरे, सोशल मिडियाचे जिल्हाध्यक्ष भुषण तालेसह सर्व तालुकाध्यक्ष, सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.