गजानन सोमाणी : संपूर्ण देशवासीयांचे लक्ष लागून राहिलेल्या बहुप्रतिक्षित श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला अयोध्येतील नवनिर्मित मंदिरात होत असून, राजराजेश्वर नगरीचा या उत्सवात प्रत्यक्ष सहभाग होणे एक मोठा योग आहे. या सोहळ्यात मंगल-वाद्यांचे दक्ष कलावंतांकडून सादर केल्या जाणाऱ्या वादनात अकोला येथील मायी कुटुंबातील शंतनु नरेंद्र मायी हे या सोहळ्यात तबला वादन करणार आहेत. अकोलेकरांसाठी निश्चितच गौरवाची बाब आहे.
श्रीराम यांच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात विविध राज्यांतील कलावंत पौराणिक, धार्मिक प्रसंगांच्या सादरीकरणासह मंगल-वाद्यांचे दक्ष कलावंतांकडून वादन क्रियान्वयन केल्या जाणार आहे. या मांगलिक प्रसंगी कलात्मक सुरुचिपूर्ण आणि संपूर्णतः भारतीय वाद्यांच्या एकाग्र कार्यक्रमात विलुप्त आणि प्रामाणिक, प्राचीन मंगल-ध्वनींचे समावेश केले आहे. ‘श्रीरामजन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून आयोजित या कार्यक्रमात उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, उड़ीसा, मध्य प्रदेश, मणिपुर, असम, छत्तीसगढ़, बिहार, दिल्ली, राजस्थान, आन्ध्र प्रदेश, झारखण्ड, गुजरात, तमिलनाडु आणि उत्तराखण्ड राज्यातील वाद्य वादक कलावंत सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्रातील कलावंतात अकोला येथील मायी कुटुंबातील शंतनु नरेंद्र मायी यांचा समावेश असून, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे निमंत्रण प्राप्त झाले आहे. २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जगविख्यात गायिका आशा भोसले, अनुराधा पौडवाल तथा शंकर महादेवन् यांना तबल्याची साथ करणार आहेत. देशातील संगीत क्षेत्रात प्रावीण्यप्राप्त एकूण ३१ जणांची चमू ‘मंगलध्वनी’ या कार्यक्रमात सहभागी होणार असून, शंतनू हे वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून तबला वादन करतात. १२ वर्षांपासून ते पंडित योगेश समसी यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत. ऑल इंडिया रेडिओचे ते ‘ए ‘ग्रेड आर्टिस्ट आहेत. याआधी त्यांनी अजय पोहनकर, सुरेश वाडकर यांच्यासारख्या दिग्गज गायकांसोबत साथ-संगत केली आहे. वाणिज्य पदवीनंतर त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली असून विविध शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असतो. त्यांना मिळालेल्या या संधीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अकोला शहरातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी पदाधिकारी तसेच अकोला अर्बन बँकेचे मुख्य संचालक आणि विविध संघटनात सक्रिय दिपक मायी यांचे जेष्ठ भ्राता नरेंद्र मायी यांचे चिरंजीव व उत्तम तबलावादक शंतनूची निवड ही त्याच्यातील तबला वादन कलेचा गौरव असून, एका अविस्मरणीय सोहळ्यासाठी मिळालेल्या संधीने त्यांचे परिश्रम सार्थकी लागले आहेत.