अकोला दिव्य न्युज ब्युरो : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले आहे. ‘वंचित’चा इंडिया आघाडीमध्ये समावेश होण्याचा मुद्दा रेंगाळला असल्याने अगोदर त्यावर निर्णय घ्या, तरच यात्रेत सहभागी होता येईल. अन्यथा चुकीचा संदेश जाऊ शकतो, अशी भूमिका ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. खा.राहुल गांधी यांच्या निमंत्रणाला उत्तर देणारे पत्र त्यांनी गांधींना पाठवले.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वात मणिपूर ते मुंबई अशी सुमारे सहा हजार ७०० किलोमीटरची पदयात्रा सुरू करण्यात आली आहे. भारत जोडो यात्रेचा हा पुढचा टप्पा असून, भारत जोडो न्याय यात्रा असे या पदयात्रेला नाव देण्यात आले. या पदयात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण ॲड. प्रकाश आंबेडकरांना देण्यात आले. या अगोदर वंचित आघाडीने मुंबईत घेतलेल्या संविधान सन्मान सभेचे निमंत्रण राहुल गांधींना दिले होते. त्या सभेत खासदार राहुल गांधी सहभागी झाले नसले तरी त्यांनी पत्र पाठवून ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेचे कौतुक केले होते. त्यानंतर आता काँग्रेसकडून पदयात्रेचे निमंत्रण ॲड. प्रकाश आंबेडकरांना पाठविण्यात आल्याने दोन्ही पक्षांमधील संवाद वाढल्याचे चित्र आहे.
दरम्यान, अॅड. प्रकाश आंबेडकरांनी सशर्त निमंत्रण स्वीकारले आहे. ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी होणे कठीण जाईल, यावर भर दिला. वंचित बहुजन आघाडीला अद्याप इंडिया आणि महाविकास आघाडीत आमंत्रित केलेले नाही. त्यामुळे इंडियाचा घटक पक्ष नसताना यात्रेत सहभागी झाल्यास आघाडीची अटकळ बांधली जाईल. ती अद्याप झालेली नाही. वंचित बहुजन आघाडी इंडियात सहभागी झाल्याचा चुकीचा संदेश जनतेच्या मनात पसरवल्या जातील. हे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीसाठीही घातक आहे, असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात नमूद केले.